सनी देओल व अमीषा पटेल यांचा गदर २ चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २२ वर्षांनी ही जोडी सिक्वेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. पण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे. अलीकडेच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेतला होता. तसेच कलाकार आणि दिग्दर्शकावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याबाबत खुलासा केला आहे.
“माझं बॉबीवर खूप प्रेम होतं, पण…”; ५ वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलेलं ब्रेकअपचं कारण
गुरुद्वारामध्ये शूट करण्यात आलेल्या ‘गदर-२’ मधील एका दृश्यावर एसजीपीसीने आक्षेप घेतला आहे. या सीनमध्ये सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एसजीपीसीने आक्षेप नोंदवल्यावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी माफी मागितली आहे.
याप्रकरणी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्टेटमेंट दिले आहे. आपल्याला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या, असं त्यात म्हटलं आहे. “चंदीगड गुरुद्वारा साहिबमध्ये गदर २ च्या शूटिंगबद्दल काही मित्रांच्या मनात गैरसमज झाले आहेत. त्याबद्दल मी स्पष्टीकरण सादर करत आहे. सर्व धर्म समभाव, सब धर्म सद्भाव हा धडा मी शिकलो आहे आणि तो आमच्या टीमचा मंत्र आहे,” असं ते म्हणाले.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दृश्य गुरुद्वाराच्या बाहेरील भागात शूट करण्यात आले आहे. मी आणि माझे संपूर्ण युनिट प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर करतो. आमचा कुणालाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, पण जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो.”