दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची म्हणजेच ‘गदर २’ ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील ‘उड़ जा काले कावा’ गाण्याचे नवीन व्हर्जन रिलीज करण्यात आले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता चित्रपट रिलीज होण्यासाठी अवघे ८ दिवस बाकी राहिले असताना निर्मात्यांनी आणखी एक जुने गाणे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.
२२ वर्षांपूर्वी सुपरहिट ठरलेले ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे निर्मात्यांनी ‘गदर २’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या रुपात प्रदर्शित केले आहे. गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये सुरुवातीला तारा सिंग आणि सकिनाचा मुलगा ‘जीते’ वडिलांकडे मोटारसायकल घेऊन देण्याची मागणी करत असतो. तसेच गाण्यात सनी आणि अमीषा यांच्यातील एक रोमँटिक सीक्वेन्स देखील दाखवण्यात आला आहे.
हेही वाचा : “नाटकाचे ४४८ प्रयोग केले तरीही…”, प्रिया बापटने सांगितला प्रयोगादरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पोटात गोळा…”
‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे नव्याने रिलीज झाले असले तरीही मूळ गायक उदित नारायण आणि त्यांचा मुलगा आदित्य नारायण यांनीच सनी देओल आणि उत्कर्ष शर्माच्या पात्रांना आवाज दिला आहे. शबिना खानने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा : “मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा…” ‘ड्रीम गर्ल २’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा
‘गदर २’ मधील हे नवे गाणे रिलीज झाल्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, “कित्येक दिवसांपासून आम्ही या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. हे जुने गाणे ऐकून अंगावर काटा आला.”
दुसऱ्या एका युजरने, “शब्दात भावना व्यक्त करू शकत नाही. हे खूपच सुंदर गाणं आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक नक्कीच या गाण्यावर डान्स करणार” असे ट्वीट केले आहे.
दरम्यान, ‘गदर २’ या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.