बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan)ने आजपर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. यामध्ये १९९८ साली दिग्दर्शित झालेला ‘दिल से'(Dil Se) या चित्रपटाचादेखील समावेश आहे. या चित्रपटात अभिनेते गजराज रावदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. गजराज राव(Gajraj Rao) यांनी या चित्रपटात सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक घटना सांगितली आहे.
“शाहरुख माझ्याकडे आला…”
अभिनेता गजराज राव यांना नुकताच झूमशी संवाद साधला. यावेळी ‘दिल से’ चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगची आठवण त्यांनी सांगितली. त्या सीनच्या सरावात मी शाहरुखला भिंतीवर ढकलले होते, असे वक्तव्य त्यांनी केले. “तो सीन असा होता की, आम्ही शाहरुखचा पाठलाग करतो आणि त्याला पकडतो. मग मी त्याची कॉलर धरतो आणि त्याला भिंतीवर ढकलतो.” त्या सरावानंतर मणिरत्नम यांनी मला बाजूला घेतले आणि म्हणाले, “शाहरुख खान मोठा स्टार आहे, हिरो आहे. आपल्याला हा चित्रपट पूर्ण करायचा आहे, तू त्याला ढकलू शकत नाहीस.”
शाहरुख खानला भिंतीवर का ढकलले, त्यावेळी त्याची मानसिकता काय होती, यावर गजराज राव म्हणाले, “आम्ही त्यावेळी खूप कच्चे होतो. आम्ही दिल्लीच्या नाटकांत काम करत होतो, तिथून आम्ही आलो होतो. आम्ही उत्साहित झालो होतो. पण, शाहरुखची ऊर्जा सेटवरील कोणात्याही कलाकारापेक्षा १० हजार पटींनी जास्त असते.”
शाहरुख खानची त्या घटनेवर काय प्रतिक्रिया होती, याबद्दल गजराज राव म्हणाले, “शाहरुख माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू जे केलंस तेच कर. त्याचा सल्ला ऐकून मी पूर्ण ऊर्जा आणि उत्साहाने तो सीन शूट केला.”
पुढे किंग खानचे कौतुक करत गजराज राव म्हणाले, “शाहरुख हा लोहचुंबकासारखा आहे. तुम्ही त्याला कुठेही भेटा. गार्डनर किंवा शूटिंगदरम्यान कुठेही भेटलात तर तो तुम्हाला अशी वागणूक देईल की तुम्हाला वाटेल तुमच्यासारखे कोणीच नाही. शूटिंगदरम्यान तो सर्व काही विसरतो. जर तो सीनमध्ये हरवला तर तोदेखील तुम्हाला जोरात मारतो”, असे म्हणत अभिनेत्याने शाहरुख खानचे कौतुक केले आहे. शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर गजराज राव हे ‘ब्लॅकमेल’, ‘तलवार’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘मेड इन चायना’, ‘बधाई हो’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘मैदान’ अशा अनेक चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जातात.