‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ ‘अंदाज अपना अपना’सारखे चित्रपट देणारे राजकुमार संतोषी सध्या चर्चेत आहेत, नुकताच त्यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शकांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका कोण करणार यावरदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध हा चित्रपट बऱ्याच वर्षांनंतर घेऊन येत आहेत. नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, “मी कुठेतरी वाचलं की या भूमिकेसाठी राजकुमार रावला घेण्यात येणार आहे मात्र मी ठरवलं होतं या भूमिकेसाठी मला कोणताही स्टार नको होता. मला सगळे नवे कलाकार हवे होते. नथुरामच्या भूमिकेसाठी मी मराठी अभिनेताच घेणार होतो कारण त्याच्या बोलण्यात मराठी लहेजा असेल हिंदी मराठी संवाद त्याला म्हणता येतील तसेच गांधींच्या भूमिकेसाठी मी गुजराती कलाकाराला घेणार होतो. माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून पक्के होते, हा चित्रपट बनवणं सोपं नव्हतं मी नेहमीप्रमाणे चित्रपटाचे बजेट वाढवले होते.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत..