बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला.
गांधी हत्येच्या सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. यानिमित्ताने राजकुमार संतोषी सध्या बऱ्याच माध्यमांना मुलाखत देत आहेत, मनोरंजनसृष्टीतील काही मातब्बर लोकांसाठी नुकताच या चित्रपटाचं खास स्क्रीनिंगसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं.
आणखी वाचा : ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यावर काय असेल शाहरुख खानचा पुढचा प्लॅन? किंग खान म्हणतो, “उद्या मी…”
नुकतंच न्यूज १८ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा चित्रपट बनवण्यामागची मानसिकता आणि उद्देश यावर भाष्य केलं आहे. संतोषी म्हणाले, “माझ्या मनात हा चित्रपट करताना कसलीच भीती नव्हती. जर तुम्ही सत्य मांडत असाल तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. गांधीजींवरही बरेच खोटे आरोप लावले गेले अनाई गोडसेच्या बाबतीतसुद्धा अन्याय झाला. त्याने हे कृती का केलं याविषयी त्याने भाषण दिलं होतं, पण त्याचा आवाज दाबण्यात आला आणि लोकांनी त्याच्याबाबतीत एक ग्रह करून घेतला.”
गांधीजी आणि गोडसे या दोघांबद्दल लोकांना आणखी जाणून घ्यायला मदत होईल हाच या चित्रपटाचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे संतोषी म्हणाले, “मी कोणत्याही राजकीय पार्टीशी जोडलेलो नाही, माझा माझ्या कामावर विश्वास आहे आणि माझी विचारधारा ही स्वतंत्र आहे.” राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकही बदल न सुचवता प्रमाणपत्र दिलं आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’शी याची टक्कर होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.