दिग्दर्शक अनुराग कश्यपला खरी ओळख मिळवून दिली ती ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने. हे खुद्द अनुरागनेदेखील बऱ्याच मुलाखतीत कबूल केलं आहे. या चित्रपटामुळे नवे कलाकार, अभिनेते, लेखक यांची एक फळीच तयार झाली. पण तो चित्रपट एवढा सुपरहीट होऊनसुद्धा ‘गॅंग्स ओफ वासेपूर’मुळे कोणालाच आर्थिक फायदा झाला नसल्याचंही अनुरागने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं.
आता त्याच्यानंतर या चित्रपटात आमदार जे.पी. सिंग हे पात्र साकारणाऱ्या सत्यकाम आनंद यांनीही असंच काहीसं वक्तव्य केलं आहे. चित्रपटात रामाधीर सिंग यांच्या मुलाचं म्हणजेच जे.पी.सिंगचं काम सत्यकाम यांनी केलं होतं. सुरुवातीला मूर्ख वाटणारं हे पात्र शेवटी सगळी सूत्रं हलवतं तेव्हा त्या पात्राचं महत्त्व अधोरेखित होतं. एवढ्या सुपरहीट चित्रपटात काम करूनही त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचं सत्यकाम म्हणाले आहेत.
आणखी वाचा : “१३ वर्षांपूर्वी मी ‘मन्नत’बाहेर…” शाहरुख खानबद्दलची ‘ती’ आठवण शेअर करताना अॅटली झाला भावूक
‘जोश टॉक्स’मध्ये बोलताना ते म्हणाले, “गँग्स ऑफ वासेपूरनंतर माझ्या कारकिर्दीला एवढी उतरती कळा लागेल असा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता. यामुळे माझं खूप नुकसान झालं. गँग्स ऑफ वासेपूरने मला यशाच्या शिखरावर बसवलं खरं पण तिथून थेट मला खाली पाडलं. मी नैराश्यात होतो, पुन्हा नव्याने सुरुवात कशी करावी ते समजत नव्हतं. मला दारूचं व्यसन लागलं, मी भरपूर दारू प्यायचो.”
पुढे ते म्हणाले, “काम नव्हतं, पैसे नव्हते, बायकोचे दागिने गहाण ठेवले होते. कसंबसं आम्ही जगत होतो. या सगळ्यामुळे माझ्या शरीरावर परिणाम झाला आणि ब्रेन हॅमरेजमुळे मला रुग्णालयात दाखल केलं. त्यातून मी बाहेर आलो खरा, पण असे खडतर दिवस इतर कोणालाच परमेश्वराने दाखवू नये अशी मी प्रार्थना करतो.” जे.पी सिंग हे पात्र आणि सत्यकाम यांच्या कामाची लोकांनी खूप प्रशंसा केली, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांना म्हणावं तसं काम चित्रपटात मिळालं नाही.