Farmer Viral Video: धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली आहे. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी एक वृद्ध या मॉलमध्ये आला होता, पण मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखलं व धोतर नेसून आत येण्यास मनाई केली. त्याला मॉलमध्ये यायचं असेल तर पँट घालावी लागेल असं त्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अभिनेत्री गौहर खानने संताप व्यक्त केला आहे.
एका वृद्ध व्यक्तीला बंगळुरूमधील एका शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण त्याने धोतर नेसलं होतं. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडिया युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत, अनेकांनी मॉलविरोधात कारवाईची मागणी केली आहे. अशातच गौहर खाननेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
गौहर खानची पोस्ट नेमकी काय?
सोशल मीडियावर दोन दिवसांपासून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “हे अत्यंत लज्जास्पद आहे! मॉलवर कठोर कारवाई झालीच पाहिजे! हा भारत देश आहे आणि आपल्या सर्वांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे,” असं गौहर खानने इन्स्टाग्रामवर घटनेचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे.
मॉलमध्ये काय घडलं?
व्हायरल व्हिडीओत दिसतंय की एक तरुण आपल्या वृद्ध वडिलांबरोबर जीटी मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी आला होता. पण, प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांना अडवलं. या दोघांकडे चित्रपटाची आधीच बूक केलेली तिकिटं होती, तरीही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. धोतर नेसून या मॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्याने आत यायचं असेल तर पँट घालून यावं लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर त्यांनी आत सोडण्याची विनंती केली पण मॉल कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही.
मॉल कर्मचाऱ्यांनी मागितली माफी
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मॉलच्या कर्मचाऱ्यांवर खूप टीका केली. प्रकरण जास्तच चर्चेत आल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाची माफी मागत त्यांचा सन्मान केला.