Gaurav More Hindi Film : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. गेली काही वर्ष नाटक, वैविध्यपूर्ण मराठी चित्रपटांमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साध गौरवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवने हास्यजत्रेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला पण, वैयक्तिक आयुष्यात आपल्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकत तो लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. याची माहिती गौरवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव मोरे ( Gaurav More ) लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. “नवीन वर्षाची सुरुवात नव्या कामाने करतोय आशीर्वाद असू द्या” असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाचं पहिलं पोस्ट शेअर केलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss 18: “कानाखाली देईन, तू हृतिक रोशन नाहीये”, कशिश कपूर अविनाश मिश्रावर भडकली, नेमकं काय घडलं? वाचा…
गौरव मोरेची ( Gaurav More ) महत्त्वाची भूमिका असलेला ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केलं असून, लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचं आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे ‘संगी’चे निर्माते आहेत. यामध्ये शारिब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संगी म्हणजेच मैत्री… त्यामुळे याचं कथानक मैत्रीभोवती फिरणारं आहे. मात्र, पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा : ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित कुलकर्णी म्हणाले, ” ‘संगी’ हा फक्त एक चित्रपट नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातील हास्यरसाचा अनुभव आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असला तरी घरातील प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या मित्रपरिवारासह आवर्जून पाहावा. हा चित्रपट अनेकांना नॉस्टॅल्जिक बनवेल. ‘संगी’ विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत.”