प्रत्येक कलाकाराची आयुष्यात कधीतरी त्यांच्या आवडत्या कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता यावी, अशी इच्छा असते. त्यासाठी कलाकार मेहनत घेत असतात. या मेहनतीला कधी न कधी यश हे मिळतंच. असंच यश एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळालं आहे. या अभिनेत्रीचं बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.
अभिनेत्री गौरी नलावडे हिनं आजवर मालिका, चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुंदर,सोज्वळ अशा भूमिका करत तिनं तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनयासह गौरी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, सध्या गौरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
गौरीनं नुकतंच एका जाहिरातीत काम केलं आहे. सध्या तिची ही जाहिरात अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण म्हणजे यामध्ये गौरी एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे. गौरीनं ‘माचो’ या ब्रँडची जाहिरात केली असून, त्यामध्ये ती एका बार टेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्यासह या जाहिरातीत बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा असल्याचं पाहायला मिळतं. सिद्धार्थसह गौरीचा बॉल्ड अंदाज या जाहिरातीत दिसत आहे. या जाहिरातीतून गौरी पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासह झळकली आहे.
एरवी सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणारी गौरी आता मात्र एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत असल्यानं याबद्दल बरीच चर्चा होताना दिसते. तर गौरीनंही तिच्या या जाहिरातीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टखाली तितीक्षा तावडे, आरती मोरे, अभिजीत खांडकेकर, ऋतुजा बागवे या कलाकारांनी कमेंट्स करीत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यासह गौरीच्या चाहत्यांनादेखील तिची ही जाहिरात आवडली असून, त्यांनी कमेंट्स करीत गौरीच्या या कामाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, गौरी नलावडे फार निवडक कामं करताना दिसते. गौरीनं आजवर ‘अवघाची संसार’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘सुंदर आमचे घर’, ‘सूर राहू दे’ यांसारख्या मालिका आणि ‘गौदावरी’, ‘टर्री’, ‘कान्हा’, ‘फॅमिली कट्टा’ यांसारख्या चित्रपटांतून कामं केली आहेत. तर २०१० साली आलेली गौरीची स्वप्नांच्या पलीकडले ही मालिका त्या काळी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. तर आजही या मालिकेसाठी गौरी ओळखली जाते. छोट्या पडद्यासह गौरीनं मोठा पडदाही गाजवला आहे. अभिनेता ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी, वैभव तत्त्ववादी, गश्मीर महाजनी यांसारख्या अभिनेत्यांसह तिनं मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. तर नुकतीच गौरी ‘गाव बोलवतो’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यामध्ये ती अभिनेता भूषण प्रधानसह मुख्य भूमिकेत झळकली होती.