बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आमिर खान(Aamir Khan) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानच त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. ६० वर्षीय अभिनेता रिलेशनशिपमध्ये आहे. तो दीड वर्षापासून नात्यात असल्याचे त्याने म्हटले. तसेच ज्या मुलीला तो डेट करत आहे, तिची ओळखही करून दिली. गौरी असे तिचे नाव असून ते एकमेकांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखत असल्याचे आमिर खानने स्पष्ट केले. गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळूरूमधील असून सध्या ती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे.

गौरी स्प्रॅट म्हणाली…

आता आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी तिने ती आमिर खानच्या का प्रेमात पडली, तिने आतापर्यंत आमिर खानचे किती सिनेमे पाहिले आहेत, यावर भाष्य केले. गौरीने आमिर खानचे किती चित्रपट पाहिले आहेत यावर बोलताना म्हटले की, ‘लगान’ व ‘दिल चाहता है’ हे दोनच सिनेमे मी पाहिले आहेत. पुढे गौरी आमिर खानबरोबरच्या रिलेशनशिपविषयी बोलताना म्हणाली, “प्रेमळ, काळजी घेणारा जेंटलमन पार्टनर किंवा जोडीदार मला हवा होता” गौरीने असे म्हणताच आमिर खानने तिला विचारले की, “त्यानंतर तू मला शोधलेस का?”

गौरीबद्दल आमिर खानने म्हटले की, “मी अशा जोडीदाराच्या शोधात होतो, जिच्याबरोबर मी शांतपणे राहू शकेन. मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी तिची तयारी केली आहे. कारण तिला या सगळ्याची सवय नाहीये.”

आमिरने मीडियासमोर त्याच्या नवीन गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला, तेव्हा ते एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखत असल्याचे म्हटले. पण, ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुन्हा त्यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. इंडस्ट्रीबरोबर गौरीचा काहीही संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले. ती बंगळुरूमधील असून ती हिंदी चित्रपट पाहत नाही. तिने माझे काही मोजकेच चित्रपट पाहिले असतील. ती मला सुपरस्टार म्हणून नाही तर तिचा जोडीदार म्हणून बघते. पण, तिने ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे मला वाटते, असे आमिर खानने म्हटले.

दरम्यान, आमिर खानने गौरीची सलमान व शाहरूख खान तसेच त्याचे कुटुंब व मुलांशीदेखील ओळख करून दिल्याचे म्हटले आहे.