Riteish Deshmukh At Coldplay Concert : सध्या देशभरात लोकप्रिय ब्रिटीश बँड ‘कोल्डप्ले’ची चर्चा रंगली आहे. तब्बल ९ वर्षांनी या बँडने भारतात येऊन कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टची घोषणा होताच सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. इतकंच नव्हे तर यांच्या शोची सगळी तिकीटं देखील काही मिनिटांच्या आत खरेदी करण्यात आली होती. नवी मुंबईतील ‘डी वाय पाटील’ स्टेडियमध्ये या भव्य कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. सामान्य लोकांपासून ते बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला उपस्थिती लावली होती.
मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख सुद्धा कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी नवी मुंबईत पोहोचला होता. यावेळी अभिनेत्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. रितेशने या कॉन्सर्टचे इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये सुमधूर गाण्यांप्रमाणे भव्य लेझर लाइट शो देखील चाहत्यांना मिळाला. याची खास झलक रितेशने व्हिडीओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केली होती. रितेशच्या दोन्ही मुलांनी या शोचा आनंद घेतला. याशिवाय अभिनेत्याचे सासरेबुवा सुद्धा या शोला आले होते. मोबाइवर गाण्यांचे lyrics पाहून ते कोल्डप्लेची गाणी गात होते असं अभिनेत्याच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
जिनिलीया व्हिडीओ शेअर करत लिहिते, “कोल्डप्ले! काय सुंदर शो होता… या शोसाठी ठिकाण सुद्धा अगदी परफेक्ट होतं. मी आणि रितेशने यापूर्वी २०१६ मध्ये या शोचा आनंद घेतला होता आणि आता २०२५ मध्ये सुद्धा आम्ही आवर्जून या कॉन्सर्टला उपस्थित होतो. कोल्डप्ले बँड… तुम्ही आता पुन्हा भारतात विशेषत: मुंबईत येण्याची आम्ही वाट पाहतोय.”
दरम्यान, जिनिलीया-रितेशप्रमाणे अनेक मराठी कलाकार सुद्धा या कॉन्सर्टला उपस्थित होते. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कोल्डप्ले बँडचा गायक क्रिस मार्टिने मुंबईकरांसह मराठीत देखील संवाद साधला होता. “कसं काय तुम्ही सगळे ठिके आहे…सगळे छान दिसत आहात” असं म्हणत क्रिसने सगळ्या मुंबईकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. मराठीत संवाद साधून त्याने सर्वांचं मन जिंकून घेतलं.