रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असते. या दोघांनाही महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखलं जातं. देशमुख कुटुंबीय प्रत्येक सण एकत्र साजरा करत असल्याचं पाहायला मिळतं. नववर्षाच्या स्वागतासाठी अलीकडेच रितेश-जिनिलीया आपल्या कुटुंबीयांसह लातूरला गेले आहेत. या सेलिब्रेशनचे खास क्षण अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जिनिलीयाने शेअर केलेल्या फोटो-व्हिडीओमध्ये त्यांची मुलं आजीबरोबर कॅरम खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. रियान व राहील दोघेही फुटबॉलचे चाहते आहेत. त्यामुळे नववर्षाच्या व्हिडीओत त्यांना पहिल्यांदाच नेटकऱ्यांनी कॅरम खेळताना पाहिलं. यावेळी नववर्षाचे एकत्र सेलिब्रेशन करण्यासाठी जिनिलीयाचे आई-बाबा देखील उपस्थित होते.
अभिनेत्री या फोटोंना कॅप्शन देत लिहिते, “आजी-आजोबांबरोबर कॅरम… आपल्या गावी म्हणजे लातूरच्या बाभळगावी कुटुंबीयांबरोबर एकत्र नवीन वर्ष सेलिब्रेट करण्याचा आनंद काही वेगळाच आहे.” याशिवाय रितेशने देखील “मिस्टर अँड मिसेस देशमुखांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा” अशी खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रितेश-जिनिलीयाच्या वेड चित्रपटाला १ वर्ष पूर्ण झालं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता रितेश पुढचा मराठी चित्रपट केव्हा करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.