Genelia And Riteish Deshmukh : बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांकडे पाहून आजची नवीन पिढी त्यांना ‘कपल गोल्स’ म्हणते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने लग्नगाठ बांधली आणि दोघंही सुखाचा संसार करत आहेत. कधीही बॉलीवूडच्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये नसतात, त्यामुळे चाहत्यांमध्ये ही जोडी विशेष लोकप्रिय आहे. जिनिलीया व रितेश यांचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक केलं जातं ते म्हणजे, या जोडप्याने त्यांच्या मुलांना दिलेले संस्कार.
रितेश व जिनिलीया यांना रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये या जोडीने त्यांचं पहिलं अपत्य रियानचं स्वागत केलं. तर, २०१६ मध्ये रितेश-जिनिलीया दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. त्यांच्या धाकट्या लेकाचं नाव राहील असं आहे. ही दोन्ही मुलं पापाराझींसमोर येताच त्यांना आदराने नमस्कार करतात. यामुळे त्यांच्या संस्कारांचं विशेष कौतुक होतं. याशिवाय रियान व राहील हे दोघंही उत्तम फुटबॉलपटू आहेत.
जिनिलीया या दोघांच्या प्रत्येक मॅचला त्यांच्याबरोबर जाते. याशिवाय शाळेच्या अभ्यासाबरोबर अभिनेत्री दोन्ही मुलांची खेळाची आवड देखील जपते. आता अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. कारण, रितेशच्या ११ वर्षांच्या लेकाने फुटबॉलस्पर्धेत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. यामुळे जिनिलीयाने पोस्ट शेअर करत रियानचं कौतुक केलं आहे.
‘युथ फुटबॉल चॅम्पियनशिप, वयोगट – ११’ या स्पर्धेत रियान देशमुख ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला आहे. हे बक्षीस घेताना रियानने आपल्या आई-बाबांबरोबर खास फोटो काढला. यामध्ये रितेश-जिनिलीया लाडक्या लेकासाठी प्रचंड आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे.
“तू प्लेअर ऑफ द मॅच झालास आणि आज तुझे आई-बाबा सर्वात जास्त आनंदी आहेत.” असं कॅप्शन देत जिनिलीयाने लाडक्या लेकाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी सुद्धा रियानने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रितेश-जिनिलीयाची दोन्ही मुलं फुटबॉल खेळतात. वीकेंडला होणाऱ्या शालेय सामन्यांमध्ये मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिनिलीया कायम उपस्थित असते. तर, रितेश सुद्धा शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर आपल्या मुलांबरोबर धमाल करताना दिसतो.