बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री जिनिलीया जवळपास १२ वर्षांपूर्वी देशमुखांची सून झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश – जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी थाटामाटात लग्न केलं. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचं प्रेम जुळलं अन् पुढे रितेश-जिनिलीया रिलेशनशिपमध्ये आले. काही वर्षांनी दोघांनी जवळचे नातेवाईक, कुटुंबीय, बॉलीवूडचे कलाकारमंडळी यांच्या उपस्थितीत लग्न केलं.
सध्याच्या घडीला रितेश-जिनिलीया महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. मनोरंजन विश्वात या दोघांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम मिळण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यांचा साधेपणा व मनमोकळा स्वभाव. जिनिलीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या सगळ्या चाहत्यांची ती मोठ्या आपुलकीने भेट घेते. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. याशिवाय आघाडीची अभिनेत्री असूनही ती मराठमोळे सण, परंपरा मोठ्या आनंदाने साजरे करते.
हेही वाचा : Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…”
रितेशच्या लाडक्या बायकोचा नुकताच न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. परदेशातील रस्त्यावर जिनिलीया अनवाणी फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. “न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय… आणि का नको फिरू यातच आनंद आहे” असं कॅप्शन देत जिनिलीयाने तिचा अनवाणी चालतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
परदेशात अनवाणी फिरताना जिनिलीयाने तिच्या गुलाबी रंगाच्या हाय हिल्स हातात घेतल्या होत्या. याशिवाय या व्हिडीओला अभिनेत्रीने “हसते हसते कट जाए रस्ते…” हे जुनं गाणं लावलं आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
दरम्यान, जिनिलीया देशमुखच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर राहिल आणि रियान या दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्री काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. दोन्ही मुलं थोडी मोठी झाल्यावर जिनिलीयाने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली. २०२२ मध्ये आलेला रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता लवकरच जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.