जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. मूळची मराठी नसली तरीही जिनिलीयाने देशमुखांच्या घरी आल्यावर सगळे मराठी सणवार, रितीरिवाज, परंपरा याबद्दल माहिती घेतली.
जिनिलीया प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो किंवा वटपौर्णिमा पारंपरिक पोशाखात तयार होऊन जिनिलीया मोठ्या आनंदाने आपली मराठी संस्कृती कायम जपते. यामुळेच सोशल मीडियावर देखील तिचं नेहमी कौतुक केलं जातं. आज सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सगळ्या महिला वटपौर्णिमा साजरी करतात. वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून पतीच्या आयुष्यासाठी व सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतात.
हेही वाचा : “IPL मध्ये धुमाकूळ घालत होते अन् आता…”, विराट-रोहितच्या कामगिरीबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला…
मराठी कलाविश्वातील बहुतांश नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी आज वटसावित्रीची पूजा केली. याचबरोबर जिनिलीया देशमुखने सुद्धा त्यांच्या राहत्या घरी वडाची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जिनिलीया वटपौर्णिमेसाठी नटून थटून तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या नवऱ्यासाठी अभिनेत्री लिहिते, “माझे प्रिय नवरोबा रितेश… तुझ्याशिवाय एक दिवसही जाणं कठीण! तुम्हाला माझं आयुष्य ही लाभो #वटपौर्णिमा” या व्हिडीओला अभिनेत्रीने त्यांच्या ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” गाणं जोडलं आहे.
दरम्यान, रितेश-जिनिलीयाचं बॉण्डिंग पहिल्यापासूनचं प्रेक्षकांना खूप आवडतं त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.
जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ
रितेश-जिनिलीया यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, ‘वेड’च्या यशानंतर आता रितेश देशमुखने आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. यंदा शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एका नवीन ऐतिहासिक चित्रपटाची येणार असल्याची घोषणा अभिनेत्याने केली. या चित्रपटाचं नाव ‘राजा शिवाजी’ असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd