Genelia Deshmukh : आषाढी एकादशीनिमित्त आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. सर्व वारकरी, विठुरायाचे भक्त गेल्या काही महिन्यांपासून या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. संपूर्ण महाराष्ट्रात आज घरोघरी विठुरायाची पूजा केली जाते. पूजा, उपवास अशा भक्तिमय वातावरणात एकादशीचा हा उत्सव साजरा केला जातो. सामान्य लोकांप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी आषाढी एकादशीनिमित्त उपवास केले जातात. याची खास झलक अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश देशमुख व जिनिलीया यांना ओळखलं जातं. या जोडप्याच्या लग्नाला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांकडे मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही मराठी सण, उत्सव, परंपरा ती मोठ्या आनंदाने साजरे करत असते. त्यामुळे देशमुखांच्या सुनबाईंचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं.
हेही वाचा : “माझी पंढरी सजली…”, म्हणत मराठी अभिनेत्याने दाखवली नव्या घराची झलक! वारकऱ्यांच्या प्रतिकृतीने सजवलं घर
आषाढी एकादशीनिमित्त देशमुखांच्या घरी बनवले खास पदार्थ
आषाढी एकादशीच्या निमित्त जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांसह लातूरच्या घरी गेली आहे. देशमुखांचं मूळ घर लातूरला आहे. याठिकाणी सणवाराला सगळे कुटुंबीय एकत्र जमतात. जिनिलीयाने घरातली सगळी लहान मुलं एकत्र पंगतीला बसल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आज एकादशीनिमित्त अभिनेत्रीच्या घरी खास उपवास थाळी बनवण्यात आली होती. वरईचा भात, बटाट्याची भाजी, साबुदाणा खिचडी, ड्रायफ्रुट्स, राजगिऱ्याच्या पुऱ्या या पदार्थांनी परिपूर्ण अशी ही उपवास थाळी होती. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलीयने याला “एकादशीनिमित्त लातूरच्या घरी खास जेवण” असं कॅप्शन दिलं आहे.
जिनिलीया वटपौर्णिमा, आषाढी एकदाशी, गणपती, दिवाळी असे सगळे सण मोठ्या हौशीने साजरे करते. या दोघांनी नुकतीच जोडीने अंबानींच्या लग्नसोहळ्यात उपस्थिती लावली होती. यावेळी देखील अभिनेत्रीने मराठमोळा लूक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रितेश आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं होस्टिंग करणार आहे. तर, अभिनेत्री जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या दोघांना संपूर्ण महाराष्ट्रातून नेहमीच भरभरून मिळतं.