Genelia Deshmukh Marathi Look At Anant Ambani & Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाहसोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. अशातच सर्वांच्या लाडक्या जिनिलीया देशमुखने पुन्हा एकदा लक्षवेधी लूक केल्याचं पाहायला मिळालं. देशमुखांची सून खास मराठमोळ्या लूकमध्ये अंबानींच्या लग्नसोहळ्याला पोहोचली आहे. यामुळे तिचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. मूळची मराठी नसली तरीही जिनिलीयाने देशमुखांच्या घरी आल्यावर सगळे मराठी सणवार, रितीरिवाज, परंपरा याबद्दल माहिती घेतली.

हेही वाचा : Video : अखेर तो क्षण आलाच! लग्नमंडपात अंबानी कुटुंबाची रॉयल एन्ट्री, मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानींचा उत्साह

जिनिलीया कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाताना नेहमीच पारंपरिक लूक करण्यास प्राधान्य देते. अगदी याचप्रमाणे अंबानींच्या लग्नसोहळ्यात देखील जिनिलीयाच्या मराठी लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी, त्यावर गोल्डन रंगाची शाल, कपाळी चंद्रकोर, नाकात नख, हातात चुडा या पारंपरिक मराठी लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. पती रितेशसह तिने अंबानींच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे.

हेही वाचा : Isha Ambani Lehenga: शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले ४ हजार तास! जाणून घ्या खास वैशिष्ट्य…

जिनिलीयाने लग्नमंडपात एन्ट्री घेताच सर्व पापाराझींनी तिला “वहिनी वहिनी…” म्हणून आवाज देण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीचा लूक पाहून सगळेजण भारावले होते. अगदी जिनिलीयाचा पती व अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा तिला पापाराझींसमोर एकटीने पोज देत फोटो काढ असा आग्रह केला. या दोघांचं हे गोड नातं पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर देशमुख जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाचं बॉण्डिंग पहिल्यापासूनचं प्रेक्षकांना खूप आवडतं त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात. या जोडप्याला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. आता जिनिलीया लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh marathi look at anant ambani wedding grabs attention video viral sva 00