Genelia Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ओळख, मैत्री अन् त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश व जिनिलीया यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत.

जिनिलीयाने २०१४ मध्ये रियानला जन्म दिला. यानंतर २०१६ मध्ये या जोडप्याने त्यांचा दुसरा मुलगा राहिलचं स्वागत केलं. अभिनय क्षेत्रातील करिअर सांभाळून अभिनेत्री सध्या आपल्या कुटुंबाकडे सुद्धा तेवढंच लक्ष देताना दिसते. सणवार असो किंवा रियान-राहिलचे शाळेतील कार्यक्रम; जिनिलीया सगळ्या ठिकाणी पुढाकार घेऊन उपस्थित असते. अभिनेत्रीने नुकतीच आपल्या दोन्ही मुलांच्या शाळेत एका कार्यक्रमानिमित्त उपस्थिती लावली होती. यावेळी जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांमधले कलागुण पाहून थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. याबाबत पोस्ट शेअर करत तिने दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे.

जिनिलीया लिहिते, “माझ्या मुलांच्या शाळेतील कान्सर्ट दरवर्षीच खूप सुंदर असतात. आज माझ्या लहान मुलांना परफॉर्म करताना पाहून माझं हृदय आनंदाने भरून गेलं आहे. तुमचे आई-बाबा आज तुम्हाला असे चिअर करत आहेत जसं की ते स्वत:च परफॉर्म करत आहेत.”

जिनिलीया व रितेश यांच्या ८ वर्षांच्या धाकट्या लेकाने शाळेतील कॉन्सर्टमध्ये लाइव्ह गाणं गायल्याचं पाहायला मिळालं. राहिलचा परफॉर्मन्स सुरू असताना जिनिलीयाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तर, दुसरीकडे अभिनेत्रीचा मोठा लेक रियान चक्क ड्रम हे वाद्य वाजवताना दिसला. आपल्या लेकाला ही कला एवढी उत्तम अवगत झाल्याचं पाहून स्वत: अभिनेत्री थक्क झाली होती.

जिनिलीयाने दोन्ही मुलांचे परफॉर्मन्स पाहून त्यांच्या शिक्षकांचे आभार मानले. रियान आणि राहिलच्या परफॉर्मन्सची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाच्या दोन्ही मुलांमध्ये फारच सुंदर बॉण्डिंग आहे. रियान आणि राहिल कायमचं एकमेकांना साथ देत असल्याचं पाहायला मिळतं. नेटकरी देखील या दोघांच्या संस्कारांचं कायम कौतुक करताना दिसतात.

Story img Loader