Chhaava Movie : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातून सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्याच दिवशी ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केल्याचं पाहायला मिळालं. सध्या चित्रपटागृहातील अनेक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्मान खुराना, राजकुमार राव या कलाकारांनी विकीसाठी खास पोस्ट लिहित त्याचं कौतुक केलं आहे.

विकी कौशलने या भूमिकेसाठी जवळपास ७-८ महिने प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे त्याच्या अभिनयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. अशातच आता बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यावर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

जिनियीला लिहिते, “प्रेक्षकांसाठी असे काही कलाकार असतात ज्यांच्याकडून नेहमी आपल्याला सकारात्मक अपेक्षा असते की, हे काहीतरी चांगलंच करणार, विकी कौशल माझ्यासाठी तसा अभिनेता आहे. त्याची मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा खूप काही सांगून जातो. ऑनस्क्रीनवर विकी ज्याप्रकारे भूमिका साकारतो, यात त्याने घेतलेली मेहनत दिसून येते. खूप अभिनंदन विकी कौशल, रश्मिका मंदाना, मॅडडॉक फिल्म्स, लक्ष्मण उतेकर, अक्षय खन्ना आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन! तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम”

जिनिलीया देशमुखची पोस्ट विकी कौशलने स्वत:च्या अकाऊंटवर रिशेअर करत, “जिनिलीया तू लिहिलेल्या अभिप्रायासाठी तुझे खूप खूप आभार” असं म्हटलं आहे. दरम्यान, ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं गेल्या सहा दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे. चित्रपटाचं एकूण कलेक्शन २०३.६८ कोटींच्या घरात जाऊन पोहोचलं आहे. आता येत्या काळात ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर कोणते रेकॉर्ड्स मोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Chhaava Movie
Chhaava Movie

‘छावा’ सिनेमात विकीसह रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, डायना पेंटी, अक्षय खन्ना, विनीत सिंह, प्रदीप रावत, संतोष जुवेकर, नीलकांची पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, आता लवकरच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित एक नवीन ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. ‘राजा शिवाजी’ असं या सिनेमाचं नाव असून सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करणार असून याची निर्मिती ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख करणार आहेत. तसेच या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत.

Story img Loader