अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची जोडी बॉलीवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेशबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर जिनिलीयाने करिअरमधून ब्रेक घेतला होता. दोन मुलं झाल्यानंतर जिनिलीयाने पुन्हा ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.
जिनिलीया आणि रितेशला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. अभिनय क्षेत्रात पुनरागमन केल्याने अनेकदा तिला मुलांसाठी वेळ मिळत नाही. अशावेळी जिनिलीया त्यांच्या शाळेच्या जेवणाच्या डब्यात खास पत्र लिहून ठेवते. या पत्रात नेमकं ती काय लिहिते? पाहूयात…
अभिनेत्री या पत्रात लिहिते, “माझ्या प्रिय बाळा! मला तुझी खूप आठवण येते आहे. नेहमी लक्षात ठेव… कायम दयाळू वृत्ती ठेवं आणि कणखर राहा…आय लव्ह यू, तुझीच आई” ही छोटीशी पत्र जिनिलीयाने दोन्ही मुलांच्या जेवणाच्या डब्यासह जोडली आहेत आणि बरोबर एक छानसं गुलाबाचं फूल ठेवलं आहे. दोन्ही मुलांच्या पत्रात सारखाच संदेश लिहिला आहे. हा फोटो अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“कामानिमित्त बाहेर असल्यावर मला माझ्या मुलांना वेळ देता येत नाही. अशावेळी मनात अपराधी भावना असते. त्यामुळे मी माझ्या मुलांच्या डब्यात अशी लहानशी पत्र ठेवते. जेणेकरून दोघंही आनंदी होतील.” असं कॅप्शन जिनिलीयाने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं मीडियामध्ये नेहमीच कौतुक होत असतं. दोघेही मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.