दक्षिणात्य, चित्रपट, मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख. डिसेंबर मध्ये प्रदर्शित झालेल्या वेळ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आणि सर्वांची मनं जिंकली. आता जिनिलीयाची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
जिनिलीया गेली अनेक वर्ष अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठीही सर्वजण उत्सुक असतात. ती देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. आता एका पोस्टमधून जिनिलीयाने तिच्या मनातली एक सल अनेक वर्षांनी बोलून दाखवली आहे.
जिनिलीयाने तिचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. पण लक्ष वेधून घेतलं तर तिने या व्हिडीओखाली लिहिलेल्या कॅप्शनने. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “हसत राहण्याची आठवण करून देण्यासाठी ही पोस्ट. हसत राहा. हसणं फक्त एक उत्तम औषध नाहीये तर दिवसाला सुंदर दिवस बनवण्याची ताकद त्यात आहे. जेव्हा मी पहिल्यांदा अभिनयाची सुरुवात केली तेव्हा मला अनेकांनी एकच गोष्ट सांगितली आणि मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे, तुझं हसू खूप जास्त मोठं आहे. तुला त्यावर काम करावं लागेल.”
हेही वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं
पुढे तिने लिहिलं, “मी जर त्यांचं ऐकलं असतं तर आज मी एक दुःखी आणि स्वतःमधल्या कमीपणाला कुरवाळत बसलेली व्यक्ती असते. माझ्यातला कमीपणा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा असता. पण मी तसं केलं नाही. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद माना.” मराठीची ही पोस्ट खूप चर्चा झाली असून जिनिलीयाच्या सकारात्मकतेचं आणि तिने दाखवलेल्या धैर्याचा सर्वजण कौतुक करत आहेत.