प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. वयाच्या ७२व्या वर्षी पंकज उधास यांनी मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताला मुलगी नायाब उधास यांनी दुजोरा दिला.
सोशल मीडियावर नायाब उधास पोस्ट करत म्हणाल्या, “आपल्याला कळवताना दुःख होत आहे की, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचं दुःखद निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उधास परिवार.” पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – Pankaj Udhas Death: गझल हृदयाला भिडवणारा जादुई आवाज शांत! गायक पंकज उधास यांचं निधन
पंकज उधास हे मूळचे गुजरातमधील जीतपूरचे. १७ मे १९५१ साली त्यांचा जन्म झाला होता. त्याचे वडील शेतकरी होते. पंकज यांना दोन भाऊ असून ते सर्वात छोटे होते. त्यांचे दोन्ही मोठे भाऊ मनहर उधास व निरमल उधास हे देखील गझल गायक आहेत. ‘चिट्ठी आई है…’ ‘चांदी जैसा रंग है तेरा…’, अशा गाण्यांमुळे पंकज उधास यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी सर्वात पहिला स्टेज परफॉर्मन्स लता मंगेशकर यांच्याबरोबर केला होता.
पंकज उधास यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. शेजारच्या नातेवाईकांनी पंकज यांची पत्नी फरीदा यांच्याशी पहिली भेट करून दिली होती. त्यावेळी पंकज उधास पदवीचे शिक्षण घेत होते. तर फरीदा हवाई सुंदरी होत्या. शेजारच्या नातेवाईकांनी दोघांची भेट करून दिल्यानंतर त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सतत एकमेकांबरोबर वेळ घालवू लागल्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पंकज व फरीदा यांच्या नात्यात धर्म आड येत होता. पण पंकज उधास त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी फरीदा यांच्याशीच लग्न केलं.
लग्नानंतर दोन मुली झाल्या. एका मुलीचं नाव नायाब असून दुसऱ्या मुलीचं नाव रिवा उधास आहे. नायाब यांनी भारतीय शास्त्रीय संगीतकार ओजस अधिया यांच्याशी लग्न केलं आहे. नायाब यांचा म्युझिक बँड असून याद्वारे अनेक संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर पंकज उधास यांची दुसरी मुलगी रिवा यांचा देखील संगीत क्षेत्राशी संबंध आहे. पण त्या लाइमलाइटपासून दूर असतात.