ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांचं निधन झालं आहे. त्यांनी ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ‘गोल माल’, ‘नमक हलाल’ आणि ‘इंकार’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. हरीश यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
बालकलाकार साईशा भोईरच्या आईचे दागिने अन् मालमत्ता जप्त होणार; बँक खात्यात आढळले कोट्यवधी रुपये
हरीश मॅगन यांच्या निधनाची माहिती मिळतातच सेलिब्रिटी आणि चाहते शोक करत आहेत. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर शेअर केली. पोस्टमध्ये ते १९८८ पासून या संघटनेचे सदस्य असल्याचं दिसत आहेत. “CINTAA हरीश मॅगन (जून १९८८ पासून सदस्य) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करते,” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
एफटीआयआयमधून शिक्षण घेतलेले हरीश मॅगन ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शहेनशाह’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसले होते. ‘उफ़! ये मोहब्बत’ हा १९९७ मध्ये आलेला त्यांचा अखेरचा चित्रपट होता. नंतर ते अभिनय करताना दिसले नाही. पण ते मुंबईतील जुहू इथं हरीश मॅगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट चालवायचे.