आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा होय. ९० च्या दशकात तो सुपरस्टार होता. इल्जाम या चित्रपटातून या अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘लव्ह ८६’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ‘महाराजा’, ‘पार्टनर’, ‘एक और एक ग्यारह’, ‘आँखे’, ‘क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘हसीना मान जायेगी’, ‘हीरो नंबर १’ अशा अनेक चित्रपटांतून गोविंदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र, असा एक काळ आला की, जिथे गोविंदाच्या उतरत्या काळाला सुरुवात झाली.

“त्यानं सेटवर पेन आणायची बंदी घातली”

आता ट्रेड एक्स्पर्ट कोमल नाहटा यांनी याबद्दल वक्तव्य केले आहे. विशाल म्हलोत्राच्या यूट्यूब चॅनेलला नुकतीच त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी गोविंदाविषयी बोलताना त्यांनी म्हटले, “गोविंदा ऑल राऊंडर आहे; मात्र तो ज्योतिषांच्या आहारी गेला होता. जे त्याला सांगायचे की काय करायला पाहिजे आणि काही नाही. मी एक गोष्ट ऐकली आहे. तो एक शो होस्ट करीत होता. त्यावेळी त्याला असं सांगण्यात आलेलं की, पेनमुळे त्याचं नुकसान होऊ शकते. जीतो छप्पर फाड के या गेम शोचं तो होस्टिंग करीत होता. त्यामुळे त्यानं सेटवर पेन आणायची बंदी घातली होती. ज्यानं त्याला हे सांगितलं त्याचा हा अर्थ असेल की, एखादा पत्रकार त्याच्याबद्दल वाईट लिहिण्याची शक्यता आहे. पण, गोविंदानं ते शब्दश: घेतलं आणि त्यानं सांगितलं, “सेटवर भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडील, प्रेक्षकांकडूनदेखील त्यांचा पेन जमा करा.”

हेही वाचा: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुपरहिट चित्रपट OTT होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी

याआधी पहलाज निहलानी यांनीदेखील गोविंदाबद्दल असे किस्से सांगितले होते. त्यांनी फ्रायडे टॉकीजला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाविषयी बोलताना म्हटलं होतं, “तो हळूहळू अंधश्रद्धाळू होत गेला. तो लोकांना सांगायचा की, आता झुंबर सेटवर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा किंवा लोकांना कपडे बदलण्यासाठी सांगायचा. काही गोष्टी ठराविक दिवशी कऱण्यास नकार द्यायचा. अशा सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या उतरत्या काळाला सुरुवात झाली.”

दरम्यान, गोविंदाला त्याच्या मुंबईतील घरी परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली. आज (१ ऑक्टोबरला) पहाटे ही घटना घडली. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.