हिंदी चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांना कोण ओळखत नाही? छोट्या छोट्या भूमिकांमधून गोविंद नामदेव यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या भूमिकांसाठी ते आसपासच्या लोकांकडून प्रेरणा घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक किस्सा त्यांनी नुकताच शेअर केला आहे. गोविंद नामदेव यांनी ‘ओह माय गॉड’ चित्रपटात साकारलेलं सिद्धेश्वर बाबा हे पात्र एका खऱ्या साधूपासून प्रेरित असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे.
‘ओह माय गॉड’ या चित्रपटात परेश रावल आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका होती. यात सिद्धेश्वर स्वामी या ढोंगी बाबांचे पात्र गोविंद नामदेव यांनी साकारले होते. गोविंद नामदेव यांनी साकारलेली पात्र एवढी लोकांना का आवडतात याविषयी त्यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “मी आपल्या समाजातील विविध लोकांचे गुण वेचून माझ्या भूमिकेनुसार त्यात त्यांचा वापर करतो. त्यामुळेच त्या भूमिका लोकांच्या मनावर छाप पाडतात.”
आणखी वाचा : ‘कोण होणार करोडपती’मध्ये परेश रावल यांची हजेरी; मराठी रंगभूमीबद्दल म्हणाले, “तुमच्या नाटकांचा दर्जा…”
‘ओह माय गॉड’ चित्रपटातील पात्राबद्दल ते म्हणाले, “त्या चित्रपटात जे पात्र होतं, तशीच व्यक्ती मी १०-११ वर्षांचा असताना पाहिली होती. मध्य प्रदेशमधील सागर शहरात मी आणि माझे मित्र तेव्हा दर रविवारी नदीकाठी फिरायला जायचो, तिथल्या नदी पात्रात आम्ही मित्र बऱ्याचदा खेळायचो, तिथलं पाणी प्यायचो. एके दिवशी एका साधूने आम्हाला खडसावले. हे पाणी ते त्यांच्या शिवलिंगाच्या अंघोळीसाठी वापरतात आणि आम्ही ते पाणी खराब करत होतो असं त्यांचं म्हणणं होतं.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही काही त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही, आम्ही दर रविवारी नदीकाठी धमाल करायचो. एकेदिवशी मी तिथलं पाणी पित होतो तेव्हा त्या साधूनी मला बकोटीला पकडून मागे खेचलं. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते, आम्हाला त्यांच्या रागाचा अंदाज आला अन् त्यानंतर त्यांनी आम्हाला चांगलंच फटकावलं. जेव्हा मी ओह माय गॉडमधील ते पात्र साकारत होतो तेव्हा मला त्याक्षणी त्या बाबांची आठवण आली अन् त्यामुळेच ते पात्र इतकं उत्तम साकारता आलं.” गोविंद नामदेव आता लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘सॅम बहादूर’मध्ये झळकणार आहेत.