‘मरते दम तक’, ‘किस्मत’, ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर १’, ‘आंटी नंबर १’ या आणि अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता म्हणजे गोविंदा (Govinda). ९० च्या दशकात आपल्या बहारदार अभिनयाने व नृत्याने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या विनोदी भूमिकांना तर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आपल्या अभिनयाने व नृत्याने चर्चेत राहणारा गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत.

गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटाच्या बातम्यांचे खंडन केले होते. पण गोविंदाच्या वकिलाने एका निवेदनात म्हटले होते की, सुनीताने ६ महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ही घटना ६ महिने जुनी आहे आणि आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. दोघांच्या नात्यात सारं काही आलबेल असलं तरी गोविंदा आणि सुनीता कधीही एकत्र दिसत नाहीत. अनेक कार्यक्रमांना त्यांची एकत्र उपस्थिती नसते. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सुनीता सहभागी झाली होती

यावेळी तिच्याबरोबर मुलगा यशवर्धन आणि मुलगी टीनाही होती, पण गोविंदा मात्र कुठेच दिसला नाही. दोघांच्या या एकत्र राहण्याबद्दल आता गोविंदाचे जवळचे मित्र टिनू वर्मा यांनी भाष्य केले आहे. ‘फिल्मी मंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत टिनू वर्मा यांनी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर तसेच अभिनेत्याच्या गोळीबाराबद्दलही भाष्य केलं आहे. ‘सुनीता आहुजा आणि गोविंदा घटस्फोट घेणार आहेत असे म्हटले जात आहे. तर हे घडणार आहे का? किंवा घडले आहे का? कारण ते एकत्र राहत नाहीत’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

गोविंदा व पत्नी सुनीता अहुजा
गोविंदा व पत्नी सुनीता आहुजा

यावर टिनू वर्मा उत्तर देत म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला गेलो आहे तेव्हा तेव्हा मी चिची भैयाला (गोविंदा) एकटे पाहिले आहे. आम्ही बोलतो किंवा चर्चा करतो तेव्हा मला तो घरी एकटाच दिसतो. आम्ही एका कुटुंबियांसारखे आहोत. तो (गोविंदा) मला खूप आवडतो. दोन वर्षांपूर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हाही तो एकटाच होता. मला माहित नाही. पण मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा मला चिची भैया घरी एकटाच भेटायचा. पण तो नेहमीच एकटा असायचा.”

गोविंदा व पत्नी सुनीता आहुजा
गोविंदा व पत्नी सुनीता आहुजा

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न मार्च १९८७ मध्ये झाले. ते जवळजवळ ३७ वर्षांपासून एकत्र आहेत. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. दोघांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, सुनीता गोविंदाबरोबरचे हे नाते संपवू इच्छिते. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र यावर सुनीता आहुजाने स्पष्टीकरण दिलं आहे.