Govinda Bullet Injury : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या मिसफायर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. स्वत:च्या बंदुकीतून मिसफायर झाल्यामुळे अभिनेत्याच्या पायाला गोळी लागून तो मंगळवारी पहाटे गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती त्याच्या पत्नीने माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

गोविंदाला ( Govinda ) रुग्णालयात दाखल केल्यावर त्याच्या मॅनेजरकडून यासंदर्भात स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. गोविंदा ( Govinda ) पहाटे कोलकात्याला जाणार होता. यावेळी परवाना असलेली बंदुक साफ करून कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून बंदुक पडली आणि अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली असं गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने ‘एएनआय’शी संवाद साधताना सांगितलं. गोळी लागल्यानंतर अभिनेत्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गोळी बाहेर काढली. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत आता मुंबई पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : गोविंदाला गोळी लागल्यानंतर पहिल्यांदाच पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचली पत्नी, डिस्चार्ज कधी मिळणार याची माहिती देत म्हणाली…

मुंबई पोलीस पुन्हा नोंदवणार जबाब

‘पीटीआय’ने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी गोविंदा उपचार घेत असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. या घटनेबद्दल अभिनेत्याची पोलिसांकडून चौकशी देखील करण्यात आली. बंदुक खाली पडल्यामुळे चुकून मिसफायर झाल्याचं गोविंदाचं म्हणणं आहे. ‘न्यूज १८’ ने दिलेल्या माहितीनुसार गोविंदाने पोलिसांनी सांगितलं आहे की, २० वर्षांपूर्वीचं रिव्हॉव्हर साफ करताना बंदुक अनलॉक होऊन चुकून गोळी झाडली गेली. मात्र, पोलीस अभिनेत्याने दिलेल्या जबाबाशी असहमत आहेत आणि लवकरच अभिनेत्याचा नव्याने जबाब नोंदवण्यात येणार आहे.

पोलिसांनी गोविंदाची मुलगी टीना अहुजाची देखील चौकशी केली. या प्रकरणात तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच अद्याप कोणाविरोधतही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : Govinda Bullet Injury –भाचा कृष्णा अभिषेकने गोविंदाच्या प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची माहिती, म्हणाला, “मामाची प्रकृती…”

गोविंदाकडे वेबले कंपनीची परवाना असलेली बंदूक आहे. त्याच्या डाव्या गुडघ्याजवळ ही गोळी लागली होती. आता मुंबई पोलिसांनी गोविंदाचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर बॅलेस्टिक अहवालासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. याचा अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय अन्य चौकशी व तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, मंगळवारी अभिनेत्याला ( Govinda ) रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याची डेव्हिड धवन, शत्रुघ्न सिन्हा, रवीना टंडन अशा बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींनी भेट घेतली.