अभिनेता गोविंदाला राहत्या घरात परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. मंगळवारी (१ ऑक्टोबरला) ही घटना घडली. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करून गोळी काढली, त्यानंतर आता तीन दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गोविंदाचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात तो व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे. त्याच्या दुखापतग्रस्त पायाला पट्टी दिसत आहे. रुग्णालयाबाहेर जमलेल्या लोकांना तो भेटला आणि त्याने हात जोडून आभार मानले, यावेळी गोविंदाची लेक टीना आहुजा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
गोविंदाला डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याची पत्नी सुनिता आहुजा व लेक टीना आहुजा त्याच्याबरोबर होते. गोविंदाच्या पायाला दुखापत झाली आहे, पण तो लवकरच बरा होऊन डान्स करू शकेल, असं सुनिता आहुजाने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
हेही वाचा – गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; अभिनेत्याच्या जबाबाशी पोलीस असहमत, पुन्हा होणार चौकशी
नेमकं काय घडलं होतं?
गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्यातून सुटली जी त्याच्या पायाला लागली. गोविंदाला जवळच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना त्याच्या जुहू येथील बंगल्यात पहाटे ४:४५ वाजता घडली होती, अशी माहिती गोविंदाच्या मॅनेजरने दिली होती.
हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने नाकारली बिग बॉस १८ची ६५ कोटी रुपयांची ऑफर, कोण आहे ती?
गोविंदाला गुडघ्याच्या खाली गोळी लागली होती. त्याच्या पायातील गोळी काढायला दीड तास लागला, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. गोविंदा रुग्णालयात असताना त्याचे भाऊ किर्ती कुमार, त्याची भाची अभिनेत्री आरती सिंह, तिचा पती दीपक चौहान, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह आले होते.