Govinda Hospitalized after Shooting Himself : अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
परवानाधारक बंदुकीतून गोळी सुटली. ती गोविंदाच्या पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो सुखरूप असल्याचे समजते. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा – सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
गोविंदा जुहू बंगल्यावर एकटाच असताना ही घटना घडली. पहाटे ४:४५ वाजता घरातून घाईगडबडीत निघताना हा प्रकार घडला. त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक महिती आहे. याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळील बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.
गोविंदाच्या मॅनेजरची प्रतिक्रिया
गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने नेमकं काय घडलं, ते एएनआयला सांगितलं. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, असं शशी सिन्हाने सांगितलं.
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने ‘इंडियन एक्सप्रेस’ला पतीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असल्याचं तिने सांगितलं.