बॉलीवूडचा ९० च्या दशकातील स्टार अभिनेता म्हणून गोविंदा ओळखलं जातं. त्याकाळात आउटसायडर असलेल्या गोविंदाने इंडस्ट्रीत प्रचंड संघर्ष करून यशाचा मोठा टप्पा गाठला होता. सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता अभिनेत्याच्या वकिलाने स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोविंदा व सुनीता विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर यावर अभिनेत्याचे कौटुंबिक मित्र व वकील ललित बिंदल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुनीता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर या दोघांमधले मतभेद सोडवले गेले आणि आता हे जोडपं पुन्हा एकत्र आलं आहे, असं वकिलांनी स्पष्ट केलं आहे.

‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना ललित बिंदल म्हणाले, “आम्ही नवीन वर्षात नेपाळला फिरायला सुद्धा गेलो होतो आणि पशुपतीनाथ मंदिरात एकत्र दर्शन घेतलं. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. विवाहित जोडप्यांमध्ये अशा गोष्टी घडत राहतात, पण आता त्यांचा संसार उत्तम सुरू आहे आणि ते दोघंही कायम एकत्र राहतील.”

गोविंदा आणि त्याची पत्नी वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात या चर्चांनाही बिंदल यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, “अभिनेत्याने खासदार झाल्यावर कामकाज सुरळीत व्हावे या हेतूने बंगला खरेदी केला होता. ते लग्नानंतर ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्याच्या अगदी जवळच ( विरुद्ध बाजूला ) हा बंगला आहे. कधीकधी बैठका झाल्यावर गोविंदा बंगल्यात विश्रांती घेतो पण, अन्यथा दोघंही पती-पत्नी अजूनही एकत्र राहतात”

सोशल मीडियावरील चर्चांबाबत बिंदल म्हणाले, “पॉडकास्ट आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुनीता आहुजा यांचे अपूर्ण कोट्स सोयीस्करपणे निवडले जात आहेत आणि ते जोडप्याविरुद्ध वापरले जात आहेत. उदाहरणार्थ, त्या म्हणाल्या होत्या, ‘मुझे गोविंदा जैसा पती नहीं चाहिए’ (पुढच्या जन्मात मला गोविंदासारखा नवरा नको आहे) तेव्हा त्यांनी असंही म्हटलं होतं की, त्यांना त्याच्यासारखा मुलगा हवा आहे.”

“याशिवाय जेव्हा सुनीता म्हणाल्या होत्या की, ‘गोविंदा त्याच्या व्हॅलेंटाइनबरोबर आहे’, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अर्थ ‘तो कामात व्यग्र आहे’ असा होता. जेव्हा विवाहित जोडपं एकत्र असतं, तेव्हा लोक त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलतात हे फारच दुर्दैवी आहे. मी खात्री देऊ शकतो की, ते नेहमी एकत्र असतील आणि कधीच घटस्फोट होणार नाही” असं ललित बिंदल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, गोविंदाने मार्च १९८७ मध्ये सुनीता आहुजाशी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला टिना आणि यशवर्धन अशी दोन मुलं आहेत.