१,००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पाँझी घोटाळ्यासंदर्भात अभिनेता गोविंदाचं नाव समोर आलं होतं. तसेच गोविंदाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पाँझी घोटाळा केला. त्यांचं गोविंदाने कथितरित्या प्रमोशन व समर्थन केलं होतं, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. याबद्दल गोविंदाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
गोविंदाच्या मॅनेजरने हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी इ-टाइम्सला सांगितलं की माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये पूर्ण तथ्य नाही आणि अभिनेत्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. सिन्हा म्हणाले, “गोविंदाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. गोविंदा एका एजन्सीमार्फत एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि परत आले होते. त्यांचा त्या व्यवसाय किंवा ब्रँडिंगशी काहीही संबंध नाही.”
गुन्हेशाखेचे अधिकारी काय म्हणाले होते?
ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी या घोटाळ्याबाबत माहिती देताना म्हटलं होतं की या प्रकरणात गोविंदा संशयित किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल. “जर आम्हाला तपासात आढळलं की त्याची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या जाहिरातीपूरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात साक्षीदार बनवू,” असं ते म्हणाले होते.