९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता म्हणून गोविंदाला ओळखलं जातं. ‘हद कर दी आपने’, ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘हम’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये गोविंदाने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. रवीना टंडनपासून ते महिमा चौधरी, राणी मुखर्जी, नीलम कोठारीपर्यंत सगळ्याच अभिनेत्रींनी गोविंदाबरोबर काम केलेलं आहे. दिग्दर्शक डेव्हिड धवन तर त्याकाळात गोविंदाशिवाय कोणताच चित्रपट बनवत नव्हते. त्यांच्या बहुतांश चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत झळकला आहे.

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि गोविंदा या दोघांनी ‘पाप का अंत’, ‘महासंग्राम’, ‘इज्जतदार’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा गाजले. मात्र, एक वेळ अशी आलेली जेव्हा गोविंदाने माधुरीबरोबर काम करण्यास नकार दिला होता. या दोघांमधला वाद पुढे जाऊन कोणी सोडवला, गोविंदा माधुरीवर का चिडला होता याबद्दल जाणून घेऊयात…

माधुरी दीक्षितला रेखा, जितेंद्र आणि गोविंदा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सदा सुहागन’ हा सिनेमा १९८६ मध्ये ऑफर करण्यात आला होता. या सिनेमात माधुरीला गोविंदाबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. अभिनेत्री तेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होती आणि त्याचदरम्यान बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी माधुरीला ‘उत्तर दक्षिण’ चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती.

दिग्दर्शक सुभाष घई हे त्या काळातील एक प्रसिद्ध नाव होतं, म्हणून माधुरी दीक्षितने गोविंदाच्या ‘सदा सुहागन’ चित्रपटाची ऑफर नाकारली आणि ‘उत्तर दक्षिण’ चित्रपटामध्ये काम केलं. यामध्ये तिच्यासह जॅकी श्रॉफ आणि रजनीकांत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, पुढे जाऊन माधुरीचा ‘उत्तर दक्षिण’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि ‘सदा सुहागन’ सुपरहिट ठरला. माधुरीने सिनेमा नाकारल्याने गोविंदा दुखावला होता आणि चिडलेल्या गोविंदाने पुन्हा कधीच तिच्याबरोबर काम करायचं नाही असं ठरवलं होतं. पण, काही वर्षांनी राजेश खन्ना यांनी या दोघांच्या वादात मध्यस्थी केली होती.

राजेश खन्ना यांनी समजूत काढल्यावर गोविंदा माधुरीबरोबर काम करण्यास तयार झाला. झालं असं की, १९८९ मध्ये पुन्हा एकदा माधुरी दीक्षितला ‘पाप का अंत’ चित्रपटात गोविंदाबरोबर काम करण्याची संधी मिळाली, पण यावेळी अभिनेता तिच्याबरोबर काम करण्यास तयार नव्हता. विजय रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाने चित्रपटाचे दिग्दर्शक विजय रेड्डी यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, माधुरी दीक्षित या चित्रपटात काम करेल किंवा तो या चित्रपटाचा भाग असेल. पण, दिग्दर्शक ऐकायला तयार नव्हते. तेव्हा, सुपरस्टार राजेश खन्ना यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करत गोविंदाची समजूत काढली होती. गोविंदाला राजेश खन्ना यांच्याबद्दल खूप आदर होता, म्हणून तो त्यांची विनंती नाकारू शकला नाही आणि शेवटी माधुरीसह काम करण्यास तयार झाला. पुढे, ‘पाप का अंत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि गोविंदा-माधुरीची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Story img Loader