‘हिरो नंबर १’, ‘कुली नंबर १’, ‘पार्टनर’, ‘आँखियों से गोली मारे’, अशा अनेक चित्रपटांतून गोविंदा(Govinda) यशाच्या शिखरावर पोहोचला. ९० च्या दशकात अभिनेता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळाले. गोविंदाने आता पुनरागमन करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता मात्र अभिनेता त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
गोविंदाने नुकतीच मुकेश खन्नांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदाने म्हटले, “माझ्या करिअरमध्ये एक काळ असा होता, ज्यावेळी मला बदनामी सहन करावी लागली. काही लोक मला इंडस्ट्रीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मी अशिक्षित व्यक्ती या शिक्षित लोकांमध्ये आलो होतो आणि त्यांना मला बाहेर काढायचे होते, हे मला समजले होते. मी त्यांची नावे घेणार नाही, कारण इंडस्ट्रीमध्ये केलेल्या कामामुळे मी अजूनही टिकून आहे”, असे म्हणत चित्रपटसृष्टीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचा खुलासा गोविंदाने केला आहे.
गोविंदाच्या वेळ न पाळण्याच्या सवयीबद्दल अनेकांनी वक्तव्य केले आहे. याबरोबरच, काळानुसार गोविंदाने त्याच्यामध्ये बदल केला नसल्याचेदेखील अनेक कलाकारांनी म्हटले आहे. गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने एका मुलाखतीत गोविंदा ९० च्या दशकात अडकल्याचे म्हटले होते. गोविंदाला अनेकदा ९० च्या दशकातून बाहेर पडण्यासाठी सांगितल्याचेदेखील सुनिता आहुजाने म्हटले होते. ९० चे दशक गाजवल्यानंतर काही मोजके चित्रपट सोडले तर गोविंदा कोणत्या चित्रपटात दिसला नव्हता. आता काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. या वर्षी तीन चित्रपटांतून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे वक्तव्य गोविंदाने केले होते. आता अभिनेता कोणत्या चित्रपटातून आणि कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोविंदा व त्याची पत्नी सुनिता आहुजा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गोविंदाच्या वकिलाने यावर स्पष्टीकरण देताना त्यांच्यात सर्व काही सुरळीत चालू असल्याचे म्हटले. तसेच सुनिता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र आता ते एकत्र असल्याचे वक्तव्य केले होते.