फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असेल किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या डोक्यावर एखाद्या गॉडफादरचा हात असणं महत्त्वाचं आहे अशी काहींची समज असते. तसंच स्टारकिड असल्याचा या इंडस्ट्रीत फायदा होतो अशीही काही उदाहरणं आहेत. मात्र काहीजण या उदाहरणांना अपवाद असतात. स्टारकिड असूनही अनेकांना या इंडस्ट्रीत येण्यासाठी संघर्ष हा करावा लागतो आणि स्वत:च्या मेहनतीवर इथे आपलं स्थान निर्माण करावं लागतं.
अशीच मेहनत करत बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी एक स्टारकिड आता सज्ज झाला आहे आणि हा स्टारकिड म्हणजे बॉलीवूड अभिनेता गोविंदाचा (Govinda) मुलगा यशवर्धन आहुजा (Yashvardhan Ahuja). अनेकजण स्टार किड्सना सगळं आयतं मिळतं म्हणत ट्रोल करत असतात. पण गोविंदाचा मुलगा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर गोविंदाच्या मुलाला बॉलीवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
नऊ वर्षांत गोविंदाच्या मुलानं तब्बल ७९ ऑडिशन्स दिल्या आहेत. पण त्याला सगळीकडून नकार मिळाला. अखेर त्याचं नशीब चमकलं असून लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नऊ वर्षांच्या मेहनतीनंतर यशवर्धनला त्याचा पहिला चित्रपट मिळाला आहे. त्यामुळे गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजाच्या पदार्पणाच्या चित्रपटाची चाहते मंडळी आतुरतेनं वाट पाहत होते.

यशवर्धनने एका मुलाखतीत बोलताना त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत खुलासा केला आहे. याबद्दल त्याने म्हटलं की, “मी गेल्या नऊ वर्षांपासून ऑडिशन देत आहे. पण प्रत्येक वेळी माझ्या पदरी नकारच मिळाला. अनेकदा ऑडिशन दिलं आणि त्यानंतरच मला हे संधी मिळाली आहे. मी नऊ वर्षांपासून तयारी करत होतो आणि अनेकदा नाकारण्यात आल्यानंतर आता मी बॉलीवूडमध्ये येण्यास सज्ज झालो आहे.”

वडील गोविंदाबद्दल बोलताना यशवर्धन म्हणाला की, “प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. मी त्यांना कधीही स्क्रिप्ट पाठ करताना पाहिलं नाही. त्यांची स्मरणशक्ती खूप भारी आहे. त्यांचं टायमिंगही एकदम उत्तम आहे. डान्स आणि विनोदाच्या टायमिंगमध्ये त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना पाहून मी खूप काही शिकलो आहे.” दरम्यान, यशवर्धन राष्ट्रीय पुरस्कार विजेते साई राजेश यांच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात काही तरी बिनसले असल्याची चर्चा सर्वच माध्यमांमध्ये होताना दिसत आहे. यावर दोघांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. पण त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तांनी चाहते मंडळी काहीशी निराश होती. अशातच आता यशवर्धनच्या बॉलीवूड पदार्पणामुळे चाहते मंडळींना नक्कीच आनंद झाला असेल.