१९९० च्या दशकात अभिनेता गोविंदा (Govinda) हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार म्हणून ओळखला जात असे. अफलातून नृत्यकौशल्य, विनोदाचे उत्तम टायमिंग आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे गोविंदाने ‘बीबी नंबर १’, ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांचे योगदान दिले. या सिनेमांनी गोविंदाने बॉलिवूडमध्ये आपलं अधिराज्य निर्माण केलं. गोविंदाच्या चित्रपटांच्या सेटवरच्या आणि त्याच्या खऱ्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. खऱ्या आयुष्यात गोविंदा खूपच आज्ञाधारी होता, हे त्याची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा सांगते. सुनीता आहुजाने एकदा मुलाखतीत गोविंदाचा एक खास प्रसंग सांगितला होता, ज्यामध्ये त्याने शॅम्पेन पिण्यापूर्वी आईची परवानगी घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये गोविंदा आणि सुनीता यांनी त्यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली याचा किस्सा सांगितला होता. त्यांनी त्यांच्या लग्नाला “हाफ अरेंज आणि हाफ लव्ह मॅरेज” असं म्हटलं होतं. त्या मुलाखतीत सुनीता गोविंदाच्या आईबद्दलही बोलली होती. तसेच आईचा गोविंदाच्या जीवनावर आणि करिअरवर मोठा प्रभाव होता, असं तिने सांगितलं. गोविंदाच्या आईनेच तिला गोविंदासाठी निवडलं होतं आणि गोविंदा नेहमीच आपल्या आईचं ऐकत असे, असं ती म्हणाली होती.

हेही वाचा…पती कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक, स्वतःही कमावते, तरीही भाड्याच्या घरात राहते विद्या बालन; कारण सांगत म्हणाली…

गोविंदाने आईला फोन केला…

गोविंदा व सुनिता पहिल्यांदा बाहेर जेवायला गेले होते, तेव्हाचा किस्सा सुनिताने सांगितला. “आम्ही ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. माझा वाढदिवस होता आणि आम्हाला कँडललाइट डिनर करायचं होतं. आम्ही सासूला काही सांगितलं नव्हतं…आम्ही ठरवलं, आज आपण शॅम्पेन घेऊ. मग आम्ही ऑर्डर दिली.” याच वेळी गोविंदाने ‘आईला फोन लावला’. “ तिला विचारलं, ‘आई, मी शॅम्पेन पिऊ शकतो का?’

अशी मिळाली परवानगी…

सुनीता पुढे म्हणाली की गोविंदाने आईला फोन करून परवानगी मागितली, तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘तुला पिण्याची इच्छा आहे का? ही वाईट सवय आहे, पण जर तुला एंजॉय करायचं असेल तर कर.’ या मुलाखतीत सुनीता हसत म्हणाली की गोविंदाने आईची परवानगी घेतल्यानंतर आम्ही शॅम्पेन घेतली मग आम्ही दोघांनी डान्स केला. पण त्या शॅम्पेनचा हँगओव्हर एक आठवडाभर टिकला होता.

हेही वाचा…जिच्यासाठी मुलगा पाहायले गेला, तिच्याशीच नंतर केलं लग्न; बॉलीवूड अभिनेत्याची फिल्मी लव्ह स्टोरी, पत्नीला ठेवलेलं मुलांच्या वसतिगृहात

गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहूजा यांच्या लग्नाला आता जवळपास ३७ वर्षे झाली आहेत. जेव्हा गोविंदा चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा तो आपल्या काकांच्या घरी राहत होता. तिथेच त्याची सुनीताशी पहिली भेट झाली होती आणि हळूहळू ते प्रेमात पडले आणि नंतर त्यांचे लग्न झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda story of seeking his mother permission to drink champagne sunita ahuja psg