Govinda : सध्या अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याची चिन्हं आहेत. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या आहेत. या दोघांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. दरम्यान अभिनेता गोविंदा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या चर्चा असतानाच त्याने नीलम कोठारी या अभिनेत्रीवर व्यक्त केलेलं प्रेम, सुनीताशी त्यावेळी मोडलेला साखरपुडा आणि तिला दिलेला सल्ला या सगळ्या गोष्टी पुन्हा चर्चेत आहेत.
काय घडलं होतं ९० च्या दशकात?
१९८६ मध्ये गोविंदाने हिंदी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं आणि त्यानंतर पुढची अनेक वर्षे त्याने फक्त यश आणि यशच पाहिलं. अपयश काय? हे त्याला माहीतच नव्हतं. गोविंदाचा पहिला चित्रपट होता Love 86 या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती नीलम कोठारी. गोविंदा नीलमच्या प्रेमात पडला होता. नीलमला मोठी स्टार व्हायचं होतं. तसंच तिचं बालपण आणि पुढचं शिक्षण हाँगकाँगमध्ये गेलं होतं. गोविंदा मात्र विरारचा छोकरा होता. दोघांच्या घरांमधल्या वातावरणात जमीन आस्मानाचा फरक होता. तरीही दोघं प्रेमात पडले होते. एवढंच नाही तर गोविंदा आणि सुनीता यांचा साखरपुडा झाला होता तरीही नीलम आणि गोविंदाचं सूत जुळलं होतं. गोविंदाने १९९० मध्ये स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत हा सगळा किस्सा स्वतः सांगितला होता.
काय म्हणाला होता गोविंदा?
“आमच्या दोघांच्याही (गोविंदा आणि नीलम) घरातलं वातावरण वेगवेगळं आहे. मात्र आम्ही दोघांनीही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. आम्ही एकमेकांना सेटवर तर भेटतोच. नीलम ही अशी व्यक्ती आहे जिला भेटल्यानंतर कुठल्याही माणसाचं हृदय चोरीला जाईलच. माझंही हृदय तिने चोरलंय. मी तिच्या प्रेमात आहे.” हे गोविंदाने जाहीरपणे मान्य केलं होतं.

गोविंदा फक्त नीलमबद्दलच बोलायचा असाही काळ आला होता
दरम्यान असं असलं तरीही सुनीता आणि त्याचं नातं एकीकडे आकार घेत होतं कारण या दोघांचा साखरपुडाही झाला होता. नीलमचा गोविंदावर किती प्रभाव आहे याची कल्पना सुनीताला त्यावेळी आली होती. सुनीताने सांगितलं होतं एक काळ असाही होता की गोविंदा फक्त नीलमबाबतच बोलायचा. तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगायचा. तो मलाच नाही माझ्या कुटुंबालाही याबद्दल सांगायचा, माझ्या मित्र-मैत्रिणींनाही नीलमची महती सांगायचा. सुनीताबाबत बोलताना गोविंदा म्हणाला होता. मला सुनीता आवडायची. मी सुनीताला सांगितलं होतं तू नीलमसारखी हो, त्यावेळी तिने मला सांगितलं की मला बदलण्याचा प्रयत्न करु नकोस. मी त्यानंतर गोंधळात पडलो होतो. मी कुणाला हो म्हणू? काय करु मला प्रश्न पडला होता. यानंतर गोविंदाने सुनीताबरोबरचा साखरपुडाही मोडला होता. मात्र पुढे या दोघांनी लग्न केलं.
अभिनेता होण्याच्या आधीपासून गोविंदा आणि सुनीता यांचं नातं
गोविंदा आणि सुनीता या दोघांचं नातं हे गोविंदा अभिनेता होण्याच्याही आधीपासून सुरु झालं होतं. गोविंदाने सांगितल्याप्रमाणे त्याने सुनीताशी नातं जोडलं होतं. पण त्याच्या आयुष्यात अनेक मुली येत होत्या. तो त्यांना डेट करत असे. रोमान्सचा प्रसंग करताना गोविंदाला सुरुवातीला दडपण येत असे. मात्र ते होऊ नये म्हणून तो सुनीताला डेट करत होता असंही त्याने सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्याने हेदेखील सांगितलं की नीलमशीही मी पर्सनल लेव्हलवर जरा जास्तच गुंतलो होतो. तिच्याशी माझं सूत जुळलं होतं. मात्र मी तिला माझं लग्न झालं आहे हे सांगितलं नव्हतं. एक प्रकारे हा तिचाही छळच होता हे मला वाटतं असंही गोविंदाने म्हटलं होतं. मोठं काहीतरी घडणार होतं ते घडलंच.
सुनीताबरोबरचा साखरपुडा मोडल्यावर काय घडलं?
सुनीताला मी एक दिवस सांगितलं की तुझ्या बरोबरचं नातं मी संपवतो आहे. मी तिच्याशी झालेला साखरपुडाही मोडला होता. त्यानंतर सुनीता थेट नीलमला घेऊन आली. त्यावेळी आमच्यात वाद झाला. मी सुनीताला तिथून जाण्यास सांगितलं आणि तिच्याशी नातं तोडलं आहे असंही सांगितलं. त्यानंतर मी विचार केला होता की नीलमशी लग्न करेन. मला नीलमशी लग्न करायचं होतं. मला वाटत नव्हतं की मी तेव्हा काही चुकीचं वागलो असंही गोविंदाने म्हटलं होतं. मात्र गोविंदाने हेदेखील मान्य केलं की तसं घडलं नाही. मी आणि सुनीताने लग्न केलं. सुनीताशी लग्न करणं हे मला माझं कर्तव्य वाटलं. मी नीलमच्या प्रेमात होतो म्हणून सुनीताला दिलेलं वचन मोडणं मला योग्य वाटलं नाही. तसंच मला त्यावेळी हेदेखील जाणवलं होतं की नीलमला स्टार व्हायचं आहे, तिचं करिअर करायचं आहे. इतकं सगळं होऊन गेल्यावर आता ती आपल्याशी लग्न करणार नाही असंही गोविंदा म्हणाला होता. कदाचित नीलमलाही हे जाणवलं असेल की आम्ही दोघांनी लग्न केलं तर ते यशस्वी होणार नाही. Screen ने हे वृत्त दिलं आहे.