बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ म्हणजेच अभिनेता गोविंदा (Govinda) गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोविंदा आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याच्या बातमीने चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सुनीता यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता हे त्यांचे वकील ललित बिंदल यांनी पुष्टी केली होती, परंतु त्यांनी असेही म्हटले होते की आता या समस्या सोडवल्या गेल्या आहेत. त्यांनी आश्वासन दिले की हे जोडपे खूप एकत्र आहेत.

त्यानंतर आता सुनीता आहुजा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. गोविंदा-सुनीता यांना घटस्फोटांच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. अशातच आता या संपूर्ण प्रकरणी सुनीता यांनी कडक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांनी ट्रोलर्सनादेखील चांगलंच सुनावलं आहे. ‘एबीपी न्यूज;ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी ट्रोलिंगबद्दल आणि घटस्फोटाच्या अफवांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

याबद्दल त्या असं म्हणाल्या की, “लोक नकारात्मक गोष्टी बोलत असले तरी मी सगळं काही सकारात्मक पद्धतीने घेऊ लागली आहे. ते सकारात्मक असो वा नकारात्मक. सकारात्मक असेल तर मला ते माहित आहे. मी हा विचार करते की, ते कुत्र्यांप्रमाणे भुंकत आहेत. जोपर्यंत माझ्याकडून किंवा गोविंदाकडून थेट काही तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत लोकांनी आमच्या नात्याबद्दल कशावरही विश्वास ठेवू नये.”

गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा (फोटो सौजन्य : इंटरनेट)

सुनीता पुढे म्हणाली की, “मला एक प्रेमळ पती आणि दोन सुंदर मुलं असल्याबद्दल मी कायमच स्वत:ला भाग्यवान समजते. पण जोपर्यंत माझ्याकडून किंवा गोविंदाकडून काहीही समोर येत नाही, तोपर्यंत तुम्ही हा विचार करु नका की आमच्यात काय आहे आणि काय नाही.” शिवाय सुनीताने तिच्यावर गॉसिपचा काही परिणाम होत नसल्याचेही सांगितलं.

यानंतर सुनीताने लेक यशवर्धनच्या बॉलीवूड पदार्पणावरही भाष्य केलं. याबद्दल तिने सांगितले की, “त्याला नेहमीच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणि वडिलांच्या सावलीत न राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यशने ‘ढिशूम’, ‘बागी’ आणि ‘किक २’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तू गोविंदासारखं वागण्याचा प्रयत्न करू नकोस. गोविंदाचे स्वतःचे स्थान आहे, त्याच्यासारखे कोणीही कधीच होणार नाही.”

दरम्यान, गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी त्यांच्या नात्याबद्दल असं म्हटलं की, “दोघे अलीकडेच नेपाळला एकत्र गेले होते आणि नवीन वर्षात पशुपतिनाथ मंदिरात पूजा केली होती. त्यांनी सांगितले की, ते वेगळे राहत नाहीत. पण खासदार झाल्यानंतर गोविंदा कधीकधी कामासाठी घेतलेल्या बंगल्यात राहतो. अशा गोष्टी जोडप्यांमध्ये घडत असतात. पण ते एकत्र आहेत आणि नेहमीच एकत्र राहतील.”