बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सुनीताने उज्जैनमधील महाकाल मंदिराचे दर्शन घेतले. महाकाल मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण यातील एका फोटोमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनीता अहुजा या १५ मे रोजी महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी दर्शन घेतानाचे अनेक फोटो पोस्ट केले होते. यातील एका फोटोत सुनीता यांच्या हातात एक छोटी पर्स असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच वादाला तोंड फुटलं आहे. सुनीता यांनी मंदिर प्रशासनाचे नियम मोडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आणखी वाचा : Video : रेल्वेतील डिजीटल बोर्डवर मराठीतील सूचना पाहून अभिनेता संतप्त, म्हणाला “चौथीतील मुलांकडून लिहून घेतलं असतं तर…”
महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात बॅग किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यास मनाई असते. पण मंदिर समितीतील कोणत्याच सदस्यानं याकडं लक्ष दिलं नाही. त्यामुळं मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सुनीता आहुजांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर व्हिआयपी ट्रीटमेंटवरून मंदिर प्रशासनावर टीकादेखील केली जात आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. जर त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
महाकाल मंदिराचे व्यवस्थापक संदीप सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमची सुरक्षारक्षकांची टीम त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्यांनी मंदिरात जाणाऱ्या प्रत्येकाच्या सामानाची तपासणी करायला हवी होती. कुणीही बॅग किंवा पर्स मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार नाही, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं. त्यामुळे ज्यांनी कामात हलगर्जीपणा केलाय, त्यांच्यावर कारवाई ही होणारच”, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान सुनीता यांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या त्यांनी गुलाबी साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी त्यांच्या बाजूला ती बॅग असल्याचेही दिसत आहे. उज्जैनमधील महाकाल मंदिरात छान दर्शन झालं, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. सुनीता यांच्या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.