Govinda and his wife Sunita Ahuja : बॉलीवूडचा ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदाने वैयक्तिक आयुष्यात १९८७ मध्ये सुनीता आहुजाशी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने लगेच लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. गोविंदा आणि सुनीता यांची ओळख कुटुंबीयांमुळे झाली होती. त्यावेळी गोविंदा सिनेविश्वात सक्रिय झाला नव्हता.
अभिनेत्याची पत्नी सुनीताने जुन्या एका मुलाखतीत त्यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. सुनीताच्या बहिणीच्या नवऱ्याने गोविंदाबद्दल पहिल्यांदा तिला सांगितलं होतं आणि त्यावेळी तो कोणत्याच महिलांशी बोलत नाही असं सुनीताला वाटलं होतं. इतकंच काय, तर गोविंदा कॉलेजमध्ये शिक्षण घेताना दोन मुलींबरोबर हिंसकपणे वागलाय असंही तिच्या कानावर आलं होतं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोविंदाबद्दलच्या या सगळ्या गोष्टी ऐकून सुनीताला प्रचंड आनंद झाला होता आणि मुळेच तिने अभिनेत्याला भेटण्याचा निर्णय घेतला.
फारुख शेख यांच्या ‘जीना इसी का नाम है’ शोच्या एका एपिसोडमध्ये सुनीताने गोविंदाशी तिची ओळख बहिणीच्या नवऱ्यामुळे म्हणजेच तिच्या जीजूंमुळे झाली असल्याचं सांगितलं. सुनीताच्या जीजूंनी तिला गोविंदा मुलींशी बोलत नाही, त्याने मुलींना मारहाण केल्याचंही सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर गोविंदाशी बोलू नकोस असा सल्लाही दिला होता.
सुनीता याविषयी म्हणाली, “जीजूंनी मला सांगितलं की गोविंदाने दोन मुलींना मारहाण केली, तो मुलींशी अजिबात बोलत नाही. त्यामुळे तू सुद्धा त्याच्याशी कधीच बोलू नकोस. गोविंदाने त्याच्या कॉलेजमधल्या दोन मुलींना मारलं होतं. त्यातल्या एका मुलीला गोविंदाने छत्रीने मारलं होतं आणि दुसऱ्या मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं होतं.”
“हे सगळं ऐकल्यावर मला प्रश्न पडला हा मुलगा आहे तरी कोण, जो चक्क मुलीशीं बोलत नाहीये. त्यामुळे मी जीजूंना सांगितलं त्याला फोन करा मी त्याच्याशी बोलेन. त्यानंतर मी पहिल्यांदा त्याला भेटले.” असं सुनीताने सांगितलं.
दोघांची भेट झाल्यावर, पुढे लवकरच गोविंदा आणि सुनीता विवाहबंधनात अडकले. नुकत्याच, ‘Hauterrfly’ ला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने ती केवळ १८ वर्षांची असताना गोविंदासह लग्नबंधनात अडकल्याचं सुनीताने सांगितलं. तिच्या वडिलांची या लग्नासाठी परवानगी नव्हती, त्यामुळे ते लेकीच्या लग्नाला गेले नव्हते.
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांची पहिली भेट झाली तेव्हा दोघांची आर्थिक पार्श्वभूमी खूपच वेगळी होती. सुनीता खूपच श्रीमंत घरची मुलगी होती. तर, गोविंदाचा तेव्हा इंडस्ट्रीत संघर्षाचा काळ सुरू होता.