९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यापैंकी एक अभिनेता म्हणजे गोविंदा (Govinda) हे होते. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती, ज्यावेळी गोविंदा यांनी ७५ चित्रपटांच्या करारावर सह्या केल्या होत्या व ते एका दिवसात चार चित्रपटांवर काम करत असत. त्यावेळी खूप कमी वेळ घरी असत. अनेकदा ते शूटिंगमध्ये व्यग्र असायचे. आता सुनिता आहुजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. गोविंदा यांचे सतत कामात व्यग्र असण्याचा कधी त्रास झाला नाही, कारण त्यांचा वेळ त्यांची मुलगी टिनाबरोबर जात असे. याबरोबरच रवीना टंडन व शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींबरोबर त्यांचे चांगले नाते असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. याच मुलाखतीत त्यांनी रवीना टंडनची एक आठवणही सांगितली आहे.
काय म्हणाल्या सुनिता आहुजा?
सुनिता आहुजा यांनी नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदा यांच्या सतत काम करण्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी आठवण सांगत म्हटले, “आम्हाला त्याला भेटायलासुद्धा मिळत नसे. तो फक्त घरी यायचा, काही तास झोप घ्यायचा. त्या वेळेपर्यंत टीनाचा जन्म झाला होता, त्यामुळे मी, टीना व माझी सासू यांच्याबरोबर मी व्यग्र असे. त्यामुळे गोविंदा व्यग्र असण्याचा मला जास्त त्रास झाला नाही. याबरोबरच आऊटडोअर शूटिंग खूप असायचे, त्यामुळे ते शिमला, काश्मीरला शूटिंगसाठी जायचे आणि मी माझ्या मुलीबरोबर असायचे. त्यामुळे वेळ कधी निघून जात असे हे कळतही नसे. अनेकदा जेव्हा मद्रास, हैदराबादला शूटिंग असायचे, त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर जायचो. पॅक अपनंतर जो काही वेळ मिळायचा तेवढाच वेळ आम्ही एकत्र घालवत असू.”
आऊटडोअर शूटिंगच्या आठवणींबद्दल बोलतना सुनिता आहुजा यांनी मनीषा कोईराला, रवीना टंडन व शिल्पा शेट्टी यांच्याबरोबर खूप मजा केल्याचे म्हटले. शूटिंगनंतर आम्ही एकत्र जेवायचो, मजा करायचो अशी आठवण त्यांनी सांगितली. गोविंदा यांचे त्यांच्या सहकलाकारांबरोबरच्या समीकरणावर बोलताना त्यांनी हसत सांगितले, “रवीना अजूनही म्हणते, चीची तू जर मला पहिल्यांदा भेटला असता तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते. मी तिला सांगितले होते, घेऊन जा मग तुला कळेल.”
हेही वाचा: दोन लोकप्रिय मालिकांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप, नेटकरी म्हणाले, “एवढ्या लवकर का संपवली?”
याच मुलाखतीत सुनिता आहुजा गोविंदा यांची रवीना टंडन व करिश्मा कपूर यांच्याबरोबर ऑनस्क्रीन जोडी आवडत असल्याचे म्हटले. दरम्यान, गोविंदा व रविना टंडन यांनी ‘अंटी नंबर १’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘दुल्हे राजा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे; तर करिश्मा कपूर व गोविंदा यांनी ९० च्या दशकात गाजलेल्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केलेले आहे. यामध्ये ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’, ‘हिरो नंबर १’, ‘हसिना मान जाएगी’ या सिनेमांचा समावेश आहे.