‘ग्राउंड झिरो'(Ground Zero) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी(Emraan Hashmi) या चित्रपटातून दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘ग्राऊंड झिरो’मधून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जवळजवळ तीन मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित आहे. इमरान हाश्मी या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘ग्राउंड झिरो’मध्ये दिसणार ‘हे’ मराठी कलाकार

‘ग्राउंड झिरो’च्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, २००१ सालची ही गोष्ट आहे. काश्मिरी तरुणांना भारतीय सैन्याविरुद्ध बंड करण्यासाठी अतिरेकी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे नेटवर्क भारतीय सैन्य टॅप करते. त्यामध्ये ऐकायला मिळते की, खऱ्या मुजाहिदच्या जीवनाचा अर्थ हृदयात जोश आणि हातात बंदूक. या ट्रेलरमध्ये भारतीय सैन्य व अतिरेकी यांच्यातील गोळीबार पाहायला मिळतो. एका भिंतीवर मजकूर लिहिलेला दिसतो, “सैनिका, तुझ्या मृत्यूने तुला इथे बोलावले आहे. काश्मीरचा बदला हा गाझी घेईल.” काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जाते. त्याचा सामना करण्यासाठी टीमचे प्रमुख मुकेश तिवारी टीममधील त्यांच्यातील सर्वोत्तम व्यक्तीची निवड करतात.

बीएसएफ कमांडंट नरेंद्र नाथ धर दुबे यांची निवड केली जाते. इमरान हाश्मीने चित्रपटात नरेंद्र नाथ दुबेंची भूमिका साकारली आहे. काश्मीरमधील तरुणांना शिक्षण देऊन त्यांच्या मनातील दहशतवादाचा विचार दूर करणे, हे नरेंद्र नाथ दुबेंचे ध्येय आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सैन्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याबरोबरचपुढे ट्रेलरमध्ये भिंतीवरील मजकूर बदलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये लिहिले आहे, “गाझी, तुला तुझ्या मृत्यूने इथे आणले आहे. काश्मीरचा बदला सैनिक घेईल. गाझीची भूमिका कोणी साकारली आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्ट झालेले नाही. ती भूमिका कोणी साकारली आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच, हृदयाला स्पर्श करणारी गोष्टदेखील पाहायला मिळत आहे. गोळीबार, बॉम्बस्फोट व दमदार डायलॉग्ज यामुळे या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २००१ साली संसदेवर हल्ला करणाऱ्या गाझी बाबा या व्यक्तीला पकडण्यासाठीचे बीएसएफचे जे ऑपरेशन होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. दरम्यान, या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबरच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर व मराठी अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. त्याबरोबरच झोया हुसेन, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना व राहुल वोहरा यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. ग्राउंड झिरो या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांनी केली आहे. तर दिग्दर्शन तेजस देऊस्करने केले आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.