एखाद्या जोडप्याचा घटस्फोट झाला की ते एकत्र दिसत नाही. इतकंच काय तर ते एकत्र कामही करत नाहीत. पण एक बॉलीवूड अभिनेता मात्र त्याच्याच पूर्वाश्रमीच्या पत्नीला डेट करतोय. हा अभिनेता म्हणजे ‘राम-लीला’, ‘शैतान’, ‘हंटर’ यासारखे चित्रपट व ‘दहाड’, ‘गन्स अँड गुलाब’ तसेच ‘दुरंगा’ या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा गुलशन देवैया होय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. गुलशन त्याच्या पूर्वाश्रमीच्याच पत्नीला घटस्फोटानंतर पुन्हा डेट करतोय.
गुलशनच्या पत्नीचं नाव कॅलिरॉय आहे. ती ग्रीक नागरिक आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं आणि २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ‘जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत गुलशनने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. “ती भारतात फिरायला आली होती, त्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यावेळी ती युकेमध्ये राहत होती. ती ग्रीक नागरिक आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं,” असं गुलशनने सांगितलं.
पुढे तो म्हणाला, “एका काळानंतर आमचं वैवाहिक जीवन कठीण होत गेलं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात असणं ही गोष्ट संसार करण्यासाठी पुरेशी नव्हती. लहान लहान गोष्टींसाठी एकमेकांशी बोलायची, चर्चा करायची आमची इच्छा उरली नव्हती. मी अशा क्षेत्रात काम करतोय, जे खूप अस्थिर आणि आपल्या अंदाजापलीकडचे आहे. त्यामुळे मला व्यावसायिक पातळीवर समतोल साधण्यासाठी वैयक्तिक आयुष्यात स्थिरता हवी होती. माझं लग्न, माझं नातं मला ती स्थिरता देऊ शकत नव्हतं, त्यामुळे मी निराश होतो, माझी प्रचंड चिडचिड होत होती.”
पुढे गुलशन म्हणाला, “कॅलिरॉयच्या पण काही समस्या होत्या. ९ वर्षांच्या वैवाहिक जिवनानंतर एकमेकांसोबतच्या चांगल्या आठवणींसह अयशस्वी लग्न सांभाळण्यापेक्षा वेगळे होऊन एकमेकांपासून ब्रेक घ्यायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर आम्हाला जाणवलं की आमचं एकमेकांसाठी असलेलं प्रेम आजही आधीसारखंच आहे. त्यानंतर आम्ही मैत्रीपासून पुन्हा सुरुवात केली. नंतर नातं नव्याने सुरू करण्यासाठी आम्ही दोघांनी प्रयत्न केले. त्या मैत्रीपासून चालू झालेला प्रवास पुन्हा रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचला. सध्या तरी पुन्हा लग्न करण्याबाबत काहीच विचार केलेला नाही.”
घटस्फोटानंतर कॅलिरॉय व त्याने घेतलेल्या एका निर्णयाबाबत गुलशन म्हणाला,”माझे खूप मित्र-मैत्रिणी घटस्फोटित आहेत, त्यांच्यापैकी अनेकांचं त्यांच्या पूर्वीच्या जोडीदारांशी चांगलं नातं नाही. त्यामुळे मी व कॅलिरॉयने ठरवलं होतं की आपण तसं वागायचं नाही.” दरम्यान, घटस्फोटानंतरही गुलशन व कॅलिरॉय सोबत आहेत. ते एकमेकांबरोबर फिरायला जातात, डेटवर जातात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्यांचे एकत्र फोटोही पाहायला मिळतात.