काही कलाकार फक्त त्यांच्या चित्रपटातूनच नाही तर त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनदेखील सर्वांचे मन जिंकत असतात. अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्यापैकी एक आहे. त्याने अनेक चित्रपटांतून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. याबरोबरच तो चित्रपटांशिवाय त्याच्या वागण्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. अनेक सहकलाकारांनी त्याच्या प्रेमळ स्वभावाबद्दल याआधी सांगितले आहे. आता यामध्ये गायक गुरुदास मान याची भर पडली आहे.
“जर तुमच्याकडे हे गुण नसतील तर…”
गुरुदास मान याने नुकतीच ‘टीव्ही ९ डिजिटल’ला मुलाखत दिली. यावेळी शाहरुख खानबद्दल बोलताना त्याने म्हटले, “शाहरुख खान माझ्यावर खूप प्रेम करतो. ‘वीर झारा’मध्ये आम्ही एकत्र काम केले आहे. त्याने मला ज्या पद्धतीने मिठी मारली ती लक्षात राहील. त्याने मला त्याच्या व्हॅनमध्ये नेले आणि आम्ही जेवलो. मग त्याने मला माझ्या गाडीपर्यंत सोडले. तो दुसऱ्याला चांगली वागणूक देतो. तो अतिशय सभ्य आहे. या गोष्टीच अभिनेत्याला स्टार बनवतात. जर तुमच्याकडे हे गुण नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही.”
याच मुलाखतीत गायकाने सोनू निगमविषयीदेखील वक्तव्य केले आहे. सोनू निगमविषयी बोलताना गुरुदास मानने म्हटले, “तो खूप संस्कारी आहे. तो सभ्य आहे. इंडस्ट्रीमधील वरिष्ठांचा तो आदर करतो. सोनू निगम बऱ्याचदा मोहम्मद रफी यांच्या स्मारकाला भेट देतो. दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी तो त्यांच्या स्मारकाला भेट देत त्यांना फुले अर्पण करतो. कलाकारांच्याबद्दल त्याच्या मनात आदर आणि प्रेम आहे.”
दरम्यान, २०२१ मध्ये गुरुदास मानने डेरा बाबा मुराद शाहचा प्रमुख लाडी शाह हे तिसरे शीख गुरू अमर दास यांचे वंशज असल्याचा दावा केला होता, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता एका यूएस आधारित वेब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. भावुक होत त्याने माफी मागत म्हटले, “भूतकाळात जे काही घडले त्यामुळे नकळत लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे कान धरून आणि हात जोडून माफी मागतो.” त्याच्या या वक्तव्यामुळे तो मोठ्या चर्चेत होता.
गुरुदास मान ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.