Hansal Mehta post about Aadhar Card : बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या मुलीला आधार कार्ड काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हंसल यांच्या मुलीला वारंवार संबंधित ऑफिसमध्ये जाऊनही विविध कारणं देत माघारी पाठवलं जात आहे. मेहता यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत संताप व्यक्त केला आहे.
हंसल मेहता यांनी पोस्ट करून हा एक प्रकारचा छळ असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांची मुलगी तीन आठवड्यांपासून आधार कार्डसाठी संबंधित ऑफिसला जात असल्याचंही सांगितलं. त्यांनी पोस्ट केल्यावर UIDAI ने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. तसेच या पोस्टवर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, त्याला मेहता यांनी उत्तरं दिली आहेत.
हंसल मेहता यांची पोस्ट
“माझी मुलगी तीन आठवड्यांपासून आधार कार्डसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहे. ती भर पावसात बराच प्रवास करून रोज अंधेरी पूर्व येथील आधार कार्यालयात जाते. पण तिथला सिनिअर मॅनेजर तिला कोणत्या ना कोणत्या कारणाने परत पाठवत असतो. यावर सही करून आण, अमूक कागदपत्र आण, कागदपत्रांवर स्टॅम्प योग्य ठिकाणी नाही, आज तुझी अपॉइंटमेंट नाही, मी एका आठवड्यासाठी रजेवर आहे, अशी कारणं दिली जात आहेत. हे सर्व खूप निराशाजनक आहे, हा एक प्रकारचा छळ आहे,” असं हंसल मेहता यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हंसल मेहता यांना काय उत्तर मिळालं?
हंसल मेहता यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये सीईओ यूआयडीएआय आणि यूआयडीएआयच्या ऑफिसलाही टॅग केलं होतं. तर त्यांना त्यांच्याकडून उत्तर मिळालं. “प्रिय आधार क्रमांक धारक, ज्याठिकाणी तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतोय त्या आधार केंद्राचा पूर्ण पत्ता शेअर करा, तसेच मेसेज करून तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा. आम्ही तुम्हाला मदत करू,” असं उत्तर मिळाल्यावर मेहतांनी डिटेल्स शेअर केल्याचं सांगितलं.
हंसल मेहता यांच्या मुली
मेहतांना त्यांची पत्नी सफिना हुसेनपासून दोन मुली आहेत. किमाया व रिहाना अशी त्यांची नावं आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून जय व पल्लव अशी दोन मुलं आहेत. मेहतांचा मुलगा जय याने अलीकडेच दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ चा तो सह-दिग्दर्शक होता.
© IE Online Media Services (P) Ltd