कलाकार म्हटलं की, स्ट्रगल हा आलाच. आज काम आहे, तर उद्या नाही. कधी कामाचे चांगले पैसे मिळतात, तर कधी कमी पैशांत काम करावं लागतं. त्यामुळे अनेक कलाकारांचा संघर्ष असतो. सध्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगलबद्दल बोलताना दिसत आहेत. बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शक हंसल मेहता यांनीदेखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा संघर्षमय काळ सांगितला आहे.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत हंसल मेहता यांनी अनुराग कश्यप यांच्याबद्दल बोलताना सांगितलं, “पूर्वी मनोज बाजपेयी महेश भट्ट यांच्या अंधेरीतील फ्लॅटमधील एका खोलीत राहायचा तेव्हा आम्ही अनेकदा भेटायचो. एक दिवस मनोजच्या घरी गेलो असताना तिथे एक व्यक्ती आली. दरवाजा ठोठावला आणि म्हणाला , सर… मी म्हटलं की, मनोज झोपला आहे. त्यावर तो म्हणाला, मला तुम्हालाच भेटायचं आहे. मी ‘हायवे’ चित्रपट पाहिला होता, तेव्हा वेडा झालो होतो. मी हायवे चित्रपटाचा मोठा फॅन आहे. तुम्हालाच कधीपासून शोधत आहे. मी म्हणालो की, तू काय करतोस? मी अभिनेता आहे आणि लिहितोसुद्धा, असं त्यानं सांगितल्यावर त्याला विचारलं की, तुला एक गोष्ट सांगतो. लिहिशील का? आणि त्यावेळी त्याला सहज घाईघाईत एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, सर, मी लिहिन मला फक्त १५ हजार हवेत. घराचं तीन महिन्यांचं भाडं द्यायचं आहे. त्याला पैसे हवे होते म्हणून त्याने मला ४८ तासांत स्क्रीनप्ले लिहून दिला. मीही १५ हजारांऐवजी त्या दिवशी त्याला ७५ हजार दिले होते. कारण स्क्रीनप्ले हातात आला होता, जी चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते आणि त्या लेखकाचं नावं होतं अनुराग कश्यप”.
पुढे हंसल मेहता अनुराग कश्यप यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, “तो अनुरागचा पहिला चित्रपट होता आणि त्याने मला ३५० पानांची स्क्रिप्ट लिहून दिली होती आणि “जयते” हा चित्रपट शूट केला. त्यामध्ये सचिन खेडेकर, शिल्पा शिरोडकर, शक्ती कपूर ही कलाकार मंडळी होती; पण हा चित्रपट रिलीज झाला नाही. इंडियन पॅनोरमामध्ये तो निवडला गेला; परंतु चित्रपट रिलीज न झाल्याने मी निराश झालो”.
दरम्यान, अनुराग कश्यप हे बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शक, निर्माते व पटकथा लेखक आहेत. ते मनमर्जियान, गँग्स ऑफ वासेपूर, घोस्ट स्टोरीज, महाराजा यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात