बॉलीवूडमधील या दिग्गज अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं होतं. मुस्लीम असूनही तो हनुमान भक्त आहे. त्याच्या झीनत अमान यांच्याबरोबरच्या नात्याची तर आजही चर्चा होते. जवळपास २२ वर्षांपासून अभिनयविश्वापासून दूर असलेल्या या अभिनेत्याकडे हजारो कोटीचीं संपत्ती आहे.
ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहूनही ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या या अभिनेत्याचं नाव संजय खान आहे. आता जरी ते चित्रपटांमध्ये काम करत नसले तरी त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार होते ज्यांनी त्यांच्या काळात इंडस्ट्रीवर राज्य केले आणि नंतर ग्लॅमरविश्वापासून दुरावले. संजय खान देखील त्यापैकीच एक. दोन दशकांहून अधिक काळ अभिनयापासून दूर असूनही तो शाही थाटात आयुष्य जगतात.
संजय खान आहेत हनुमान भक्त
संजय खान हनुमान भक्त आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ते १३ महिने रुग्णालयात होते आणि मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा एका हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. एवढंच नाही तर ते सामोदे पॅलेसमधील एका हनुमान मंदिरातही गेले होते. यातून प्रेरित होऊन संजय खान यांनी ‘जय हनुमान’ या टीव्ही शोची निर्मिती केली होती, लोकांना हा शो खूप आवडला होता.
हजारो कोटींचा बिझनेस
संजय खान यांचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे वडील अफगाणी आणि आई पारशी होती. त्यांना पाच भावंड होती. बिझनेसमन वडिलांप्रमाणेच संजय खानही पूर्वी व्यवसाय करायचे. त्यांनी ८० च्या दशकातच तांदूळ निर्यात व्यवसाय सुरू केला होता, ज्यामध्ये ते मध्य पूर्वेकडील देशांना तांदूळ विकायचे. १९९७ मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘फाइव्ह-स्टार डीलक्स गोल्डन पाम्स हॉटेल आणि स्पा’ सुरू केला. २०१० पर्यंत अभिनेत्याकडे या हॉटेल आणि स्पाची मालकी होती. त्यांनी रिअल इस्टेटमध्येही गुंतवणऊक केली. २०१८ मध्ये त्यांनी अंदाजे १० हजार कोटी रुपये खर्चून थीम पार्क बांधण्याची घोषणा केली होती. मात्र काही वादांमुळे प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
संजय खान यांनी राज कपूर यांचा ‘आवारा’ चित्रपट पाहून अभिनेता व्हायचं ठरवलं होतं. १९६४ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा छोटी भूमिका साकारली. यानंतर ते ‘दोस्ती’ या चित्रपटात झळकले, हा सिनेमा हिट ठरला होता. यानंतर त्यांनी ‘दस लाख’, ‘दिल्लगी’, ‘बेटी’, ‘अभिलाषा’, ‘एक फूल दो माली’, ‘इंतकाम’, ‘उपासना’, ‘हसीनो का देवता’, ‘मेला’, ‘चोरी चोरी’ आणि ‘काला धंदा गोरे लोग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.