‘खिलाड़ी’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री आयशा झुल्काचा आज ५१ वा वाढदिवस आहे. ती अखेरची ‘हॅप्पी फॅमिली कंडिशन्स अप्लाय’ या सीरिजमध्ये दिसली होती. एकेकाळी बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या आयशाच्या करिअरला तिच्याच निर्णयाचा फटका बसला आणि करिअरला उतरती कळा लागली. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आयशा झुल्काने १९८३ मध्ये ‘कैसे कैसे लोग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ६५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ‘जो जीता वही सिकंदर’मधील (१९९२) तिच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि त्यानंतर ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले. ‘माशूक’, ‘बलमा’, ‘हंगामा’, ‘मेहेरबान’, ‘रंग’, ‘वक्त हमारा है’ आणि ‘संग्राम’ या चित्रपटांनी तिला लोकप्रियता मिळवून दिली.
१९९३ मध्ये तिने ‘दलाल’ नावाचा चित्रपट साईन केला होता. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी मारक ठरला. ‘दलाल’मध्ये तिच्याशिवाय मिथुन चक्रवर्ती, टिनू आनंद, राज बब्बर आणि रवी बहल यांच्याही मुख्य भूमिका होत्या. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सचा तिच्या करिअरवर परिणाम झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि आयशाच्या करिअरचा उतरती कळा लागली. त्यानंतर तिचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, त्या चित्रपटानंतर तिला बी-ग्रेड चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.
आयशाने त्या काळातील अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांबरोबर काम केलं होतं. त्यापैकी एक प्रकाश मेहरा होते, ज्यांनी तिला पार्थो घोषच्या ‘दलाल’ चित्रपटासाठी साइन केले होते. एके दिवशी आयशाला समजलं की पार्थो आणि प्रकाशने तिच्या नकळत बॉडी डबल वापरून एक इंटिमेट सीन शूट केला होता. त्यानंतर संतापलेल्या आयशाने दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि ही बातमी सर्वत्र पसरली.
विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदरच आयशाला एका रिपोर्टरचा फोन आल्यावर हे कळलं. ट्रायल शो पाहणाऱ्या रिपोर्टरने तिला विचारलं की तिने इतका हॉट सीन का केला? हे ऐकून तिला धक्का बसला. त्यावेळी प्रकाश मेहरा व पार्थो घोषने फसवणूक केल्याचं तिला लक्षात आलं. बलात्काराच्या सीनमध्ये त्यांनी बॉडी डबल वापरून सीन शूट केला आणि याबाबत आयशाला कल्पनाही दिली नाही. हे सर्व इतकं लपवून करण्यात आलं की तिला चित्रपट डब करतानाही याबद्दल शंका आली नाही.
२००३ मध्ये आलेल्या ‘आँच’ चित्रपटात आयशा जुल्काने नाना पाटेकरसोबत काही बोल्ड सीन्स दिले होते. त्यानंतर तिच्या आणि नाना पाटेकर यांच्या अफेअरच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, यानंतर तिने असे सीन पुन्हा कधीच केले नाही.