आपल्या अभिनयामुळे सिनेसृष्टीत ३ दशकांहून अधिक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलीवूडचा बादशाह असलेला किंग खान याच्या जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना माहीत असतील. पण मागच्या ३२ वर्षांत प्रत्येक परिस्थितीत त्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या गौरी खानबद्दल फार लोकांना माहीत नाही. आज आपण गौरीचा शाहरुख खानची पत्नी ते यशस्वी उद्योजक हा प्रवास जाणून घेणार आहोत.
गौरीचे बालपण
८ ऑक्टोबर १९७० रोजी दिल्लीमध्ये गौरीचा पंजाबी कुटुंबात जन्म झाला. तिचे वडील कर्नल रमेशचंद्र छिब्बर आणि आई सविता मूळचे होशियारपूरचे होते. ती दिल्लीच्या पंचशील पार्क भागात लहानाची मोठी झाली. तिने लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले, मॉडर्न स्कूल वसंत विहार, नवी दिल्ली इथून हायस्कूल पूर्ण केले आणि लेडी श्री राम कॉलेजमधून इतिहासात बी.ए. (ऑनर्स) पूर्ण केले. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझाईनचा सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. तिच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता, तिथेच ती शिवणकाम शिकली.
गौरी व शाहरुखची पहिली भेट
शाहरुख खानचा जन्मही दिल्लीतला. शाहरुखने गौरीला १९८४ मध्ये एका पार्टीमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा तो फक्त १८ वर्षांचा आणि गौरी १४ वर्षांची होती. पाहताक्षणीच ती त्याला आवडली. त्याने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्याने तिचा फोन नंबर मिळवला आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू मैत्री वाढू लागली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
ब्रेकअप, मुंबईत पुन्हा भेट अन् लग्न
शाहरुख व गौरी प्रेमात होते, पण तिने दुसऱ्या मुलांशी बोलणं, केस मोकळे सोडणं त्याला अजिबात आवडायचं नाही. कालांतराने छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांची भांडणं होऊ लागली. गौरी वैतागली आणि त्याच्याशी बोलणं सोडलं. याचदरम्यान ती मैत्रिणींबरोबर दिल्लीहून मुंबईला आली. शाहरुखला कळताच तोही मुंबईत आला. अक्सा बीचवर या दोघांची पुन्हा भेट झाली आणि ते एकमेकांना पाहून रडू लागले. दोघांचं पॅचअप झालं अन् त्यांनी लग्न करायचं ठरवलं.
आंतरधर्मीय लग्नाला पालकांचा विरोध
दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण त्याला घरून विरोध झाला. कारण शाहरुख मुस्लीम तर गौरी हिंदू होती. आंतरधर्मीय लग्नाला गौरीच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यांची समजूत घालण्यासाठी शाहरुखला खूप प्रयत्न करावे लागले. अखेर तिचे पालक या लग्नाला तयार झाले. आधी दोघांनी २६ ऑगस्ट १९९१ रोजी कोर्टात लग्न केलं आणि नंतर २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांचा निकाह झाला. हे सर्व शाहरुख बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यापूर्वी घडलं. लग्नानंतर शाहरुख त्याचं करिअर करण्यात व्यग्र झाला तर गौरी संसारात रमली. सहा वर्षांनी त्यांचा मुलगा आर्यनचा जन्म झाला, त्यानंतर सुहानाचा जन्म झाला.
४० व्या वर्षी गौरीने सुरू केलं करिअर
गौरीचा उद्योजक होण्याचा प्रवास स्वतः शाहरुखनेच सांगितला. “मी ग्लॅमरस क्षेत्रात काम करत होतो, त्यामुळे घर सांभाळणं, मुलांना सामान्य परिस्थितीत वाढवणं या सगळ्या जबाबदाऱ्या तिने उत्तम पार पाडल्या. आमच्या वैवाहिक जीवनातील जवळपास २५ वर्षे यातच गेली. संसारात जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या गौरीची स्वतःची स्वप्नं मात्र यात मागे राहिली. पण गौरीने ४० व्या वर्षी पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि तिचं करिअर केलं. अशाच जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची स्वप्नं पूर्ण न करता आलेल्यांसाठी गौरी हे आपल्या स्वप्नांना दुसरी संधी देण्याचं उत्तम उदाहरण आहे,” असं शाहरुख गौरीच्या ‘माय लाइफ इन डिझाइन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात म्हणाला होता.
पैसे नसल्याने गौरीला डिझाइन करावा लागला ‘मन्नत’ बंगला
“आम्ही दिल्लीत बंगल्यात राहिलो होतो, त्यामुळे मुंबईत अपार्टमेंट सिस्टिम आमच्यासाठी नवीन होती. तसेच ते अपार्टमेंट महागही खूप होते. मुंबईत काही काळ मी भाड्याच्या घरात राहिलो. त्यानंतर मी मन्नत घेतलं आणि पण ते जुनं असल्याने रिनोव्हेट करणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही एका डिझायनरला भेटलो, त्याने आम्हाला त्या भेटीत जेवढ्या रुपयांचं जेवण वाढलं होतं, तेवढे पैसे मी महिन्यालाही कमवत नव्हतो. त्यामुळे घर रिनोव्हेट कसं करायचं ही अडचण उभी राहिली. त्यानंतर मी गौरीला म्हटलं की तुझ्याकडे डिझायनिंग कौशल्ये आहेत, तर तूच का करत नाहीस. ती तयार झाली आणि अशा रितीने आमचं मुंबईतील पहिलं घर गौरीने डिझाइन केलं. त्यानंतर दिल्लीतील घरही तिनेच डिझाइन केलं होतं,” असं शाहरुखने सांगितलं.
लोअर परेलमधून गौरीने केली इंटिरिअर डिझायनिंगची सुरुवात
“गौरीने लोअर परेलमध्ये १० बाय १० च्या एका दुकानातून डिझायनिंगची सुरुवात केली. हे करताना तिने माझी मदत घेतली नाही, सगळं स्वतः केलं. सध्याच्या परिस्थितीत ती आमच्या घरातील सर्वात व्यग्र व्यक्ती आहे. माझ्याकडे व मुलांकडे वेळ असतो, पण ती मात्र तिच्या कामात असते. आम्ही तिला बऱ्याचदा विचारतो की तू इतकं काम का करतेस? त्यावर काम तिला समाधान देत असल्याचं ती सांगते. तुमच्या स्वप्नांमागे धावा, तुम्हाला जे काम समाधान देतं, शांती देतं ते काम करा हे गौरीकडे पाहून आम्ही शिकलो,” असं शाहरुख म्हणाला.
इंटिरिअर डिझायनर म्हणून गौरीने केलेलं काम
गौरी खानने मुकेश अंबानी, रॉबर्टो कॅव्हली आणि राल्फ लॉरेन तसेच अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची घरं आणि ऑफिसेस डिझाइन केले आहेत. तिने शाहरुखच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसचं ऑफिसही डिझाइन केलं होतं. डिझायनिंग व्यतिरिक्त गौरी चित्रपट निर्मातीदेखील आहे. २०१८ मध्ये गौरी खानचे नाव फॉर्च्युन मासिकाच्या ‘५० सर्वात शक्तिशाली महिलां’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. तिची संपत्ती १६०० कोटींहून अधिक आहे.