जान्हवी कपूर आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव टॉपला आहे. आज जान्हवीचा वाढदिवस आहे. पण क्षणोक्षणी तिला आई श्रीदेवी यांची आठवण सतावते. बऱ्याच मुलाखतींमध्ये जान्हवी श्रीदेवी यांच्याबाबत भाष्य करताना दिसली.
काही महिन्यांपूर्वीच जान्हवीने चेन्नई येथील श्रीदेवी यांनी खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याला भेट दिली. यावेळी तिने श्रीदेवी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तिने आईबाबत काही किस्सेही सांगितले होते. जान्हवी म्हणाली, “माझ्या आईसाठी हा बंगला खरेदी करणं फार कठीण होतं.”
“तिच्या लग्नानंतर तिला हा बंगला डेकोरेट करायचा होता. जगभरातील ज्या ठिकाणांना तिने भेटी दिल्या त्या ठिकांणाहून आणलेल्या वस्तूंनी तिला हा बंगला सजवायचा होता”. शिवाय जान्हवीने यावेळी तिच्या खासगी आयुष्याबाबतही खुलासा केला. “बंगल्यातील माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही आहे. कारण आई मला कधीच बाथरुमचा दार बंद करुन द्यायची नाही.”
“मी बाथरुममध्ये जाऊन मुलांबरोबर बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही”. असं जान्हवीने अगदी खुलेपणाने सांगितलं. यामधूनच श्रीदेवी यांना त्यांच्या मुलींची किती काळजी होती तसेच कामात असतानाही त्यांचं आपल्या मुलींवर लक्ष असायचं हे दिसून आलं.