घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा, वाढत्या वयानुसार खुलत जाणारं सौंदर्य आणि अभिनेत्री-नायिकाच व्हायचंय हा निर्धार तडीस नेणारी बिनधास्त बेबो अर्थात करीना कपूर. हिंदी चित्रपटातल्या हिरॉइनच्या साचेबद्ध प्रतिमेला छेद देत स्वबळावर चित्रपट तोलणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एक. चाळिशीत दोन मुलांची आई असतानाही मी डिझायरेबल का असू शकत नाही? असा बिनतोड सवाल करणाऱ्या करीनाचा आज वाढदिवस. कारकीर्दीत सुरुवातीला रुढार्थाने व्यावसायिक धाटणीचे चित्रपट करणाऱ्या करीनाने स्थिरावल्यानंतर चपखल कलाकृतींची निवड केली. पॉलिटिकली करेक्ट राहण्याऐवजी मनातलं बोलून टाकण्याचा तिचा स्वभाव अलीकडच्या काळात दुर्मीळच. चित्रपट ते ओटीटी असं संक्रमण करणारी करीना कुटुंबवत्सलही आहे. वर्कलाईफ बॅलन्सचं गणित सांभाळत कारकीर्दीत नवी मुशाफिरी करणाऱ्या करीनाच्या वाटचालीचा घेतलेला धांडोळा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांचा मुलींच्या अभिनयाला विरोध, एकट्या आईने केलं संगोपन

कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही अभिनेते असलेल्या वडिलांनी कपूर घरातील मुलींनी चित्रपटात करू नये, असं म्हणत विरोध केला. यामुळे तिच्या पालकांमध्ये वाद झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले. बबीता यांनी नोकरी करून दोन्ही मुलींचं संगोपन केलं. नंतर करिश्माने चित्रपटांत काम करणं सुरू केलं, त्यानंतर काही वर्षांनी करीनाही याच क्षेत्रात आली. रणधीर व बबीता वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. कालांतराने दोन्ही मुली यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र आले.

“मला घाम फुटला होता”, विजय वर्माने सांगितला करीनासोबत रोमँटिक सीन करण्याचा अनुभव; ‘त्या’ दृश्याबद्दल म्हणाला “ती खूप…”

करीनाचा पदार्पणाचा चित्रपट हातातून गेला

२००० साली करीनाला राकेश रोशनच्या ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर मुख्य भूमिकेत घेण्यात आलं होतं. पण काही दिवस शुटिंग केल्यानंतर तिने हा चित्रपट सोडला. मात्र, करीनानंतर ती भूमिका साकारणाऱ्या अमीषाने नुकताच दावा केला होता की करीनाने तो चित्रपट सोडला नव्हता, तर तिला राकेश रोशन यांनी काढून टाकलं होतं. यानंतर त्याच वर्षी तिने ‘रेफ्युजी’ चित्रपटातून पदार्पण केलं. यात तिच्याबरोबर अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात तिने नाज या बांगलादेशी मुलीची भूमिका केली होती. चित्रपटात तिने उत्तम काम केलं होतं.

पदार्पणाच्या पुढच्याच वर्षी करीना करण जोहरच्या ‘कभी खूशी कभी गम’मध्ये ‘पू’च्या भूमिकेत दिसली. तिने साकारलं हे आयकॉनिक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे, तितकं दमदार काम तिने केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ‘बेवफा’, ‘क्यों की’, ‘दोस्ती’, ‘३६ चायना टाउन’, ‘चुप चुप के’ या चित्रपटांत भूमिका केल्या.

“…त्यादिवशी मी अभिनयातून निवृत्ती घेईन,” करीना कपूरचं वक्तव्य

शाहीद-करीनाचा ‘तो’ व्हायरल फोटो

शाहीद व करीना रिलेशनशिपमध्ये असताना २००३ मध्ये त्यांचा किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. क्लबमध्ये एका तरुणाने तो फोटो काढला होता आणि नतंर तो व्हायरल झाला. शाहिद ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “त्यावेळी मी उद्ध्वस्त झालो होतो. मी फक्त २४ वर्षांचा होतो आणि मला वाटलं की माझी प्रायव्हसी हिरावून घेतली गेली आहे आणि मी काहीही करू शकत नव्हतो. त्यावेळी नेमकं काय घडतंय हेच मला कळत नव्हतं. त्या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्या वयात तुम्हाला तुमच्या भावनाही नीट कळत नाहीत. तुम्हाला एखाद्या मुलीशी कसं वागावं हे माहीत नसतं, पण तुम्ही डेट करताय आणि त्यादरम्यान अशी घटना घडते. यानंतर मी खूप सतर्क झालो होतो.”

‘जब वी मेट’ नंतर शाहीदशी ब्रेकअप

मला करीना आठवते ती जब वी मेटमधली गीत म्हणून. या चित्रपटात तिने साकारलं पात्र प्रचंड बिंदास्त होतं. करीनाने आपल्या सहज अभिनयाने चिडणारी, राग आल्यावर शिव्या घालणारी आणि बोलकी गीत उत्तमरित्या साकारली होती. खरं तर या चित्रपटातील जोडी ही तेव्हा रिअल लाइफ जोडी होती. शाहीद अन् करीना दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. २००४ मध्ये ‘फिदा’ चित्रपटात करीना आणि शाहीद पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर २००६ मध्ये दोघेही ‘चुप-चुप के’मध्ये रोमान्स करताना दिसले होते. त्याच वर्षी त्यांचा ‘३६ चायना टाउन’ रिलीज झाला होता. २००७ मध्ये ते जब वी मेटमध्ये दिसले पण शेवटचे. या चित्रपटानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. काहींच्या मते, करीनाच्या आईचा या नात्याला विरोध होता, काही रिपोर्ट्सनुसार, शाहीद व विद्या बालन यांच्यात जवळीक वाढली होती, त्यामुळे हे नातं तुटलं. पण याबाबत दोघांनीही कधीच भाष्य केलं नाही.

११ वर्षांनी मोठ्या सैफशी बांधली लग्नगाठ

करीना आणि सैफ हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं आहे. शाहीदशी ब्रेकअप झाल्यानंतर करीनाने ‘टशन’ चित्रपटा साइन केला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना व सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. सैफने आपल्या हातावर करीनाच्या नावाचा टॅटू काढून आपले प्रेम जाहीर केले. त्यानंतर करीनाने होकार दिला आणि पाच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. दोघांच्या वयात १० वर्षांचं अंतर होतं, तसेच दोघांचे धर्मही वेगळे होते. वयात अंतर असल्याने लोकांनी बरेच सल्ले दिले होते, असं करीना म्हणाली होती.

वयातील अंतराबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना करीना म्हणाली, “मला वाटतं की वय ही गोष्ट नात्यात खरंच फार महत्त्वाची नसते. तुम्ही आज सैफकडे पहाल तर तो त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी जेवढा हॉट दिसायचा त्याहून जास्त हॉट तो आता दिसतोय. त्याचा फिटनेस पाहिल्यास तो ५३ वर्षांचा आहे, यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. मला आनंद आहे मी त्याच्यापेक्षा १० वर्षं लहान आहे. आमचे विचार एकमेकांशी जुळतात आणि एखाद्या नात्यात हीच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते.”

तैमूरच्या नावावरून वाद

करीना कपूरने लग्नानंतर चार वर्षांनी २० डिसेंबर २०१६ रोजी मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं तैमूर अली खान. पण या नावावरून वाद झाला होता. तुर्कीमध्ये तिमूर नावाचा एक अत्यंत क्रूर राजा होता, त्याच्या नावावरून हे नाव ठेवलं असल्याचं म्हणत लोकांनी या जोडप्याला खूप ट्रोल केलं होतं.

याबाबत करीना म्हणाली, “मला वाटतं कोणत्याही आईला किंवा मुलाला या गोष्टीचा सामना करावा लागू नये. लोक त्यावेळी अशा पद्धतीने का बोलत होते, याचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. कोणालाही दुखवायचा आमचा हेतू नव्हता. आमच्या मुलाचं नाव तैमुर आहे, ज्याचा अर्थ आयर्न मॅन असा होता. सैफच्या शेजारी त्याचा एक मित्र राहायचा त्याचं नाव तैमुर होतं. सैफला ते नाव फार आवडलं होतं. मुंबईत राहणारा सैफचा तो पहिला मित्र असल्याने ते नाव आमच्या मुलाचं ठेवायचं ठरवलं.”

तैमुरच्या नावामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल करीना कपूरने प्रथमच मांडली स्वतःची बाजू; हे नाव का ठेवलं? याचंही दिलं उत्तर

ट्रोलिंगबद्दल बोलताना करीना म्हणाली, “जेव्हा लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली तेव्हा मला धक्का बसला होता. मी आणि सैफने ही गोष्ट फार काळजीपूर्वक हाताळली, आम्ही यावर फार बोललो नाही. आम्ही फक्त आमच्या निर्णयावर ठाम होतो. त्यावेळी आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला कधीच पश्चात्ताप झालेला नाही.”

दरम्यान, त्यानंतर करीनाने २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव जहांगीर उर्फ जेह अली खान ठेवलं आहे. करीनाचं सैफ व अमृता सिंहची मुलं म्हणजेच तिची सावत्र मुलं सारा अली खान व इब्राहिम अली खान यांच्याशी चांगलं नातं आहे. खान कुटुंब सगळे सण-उत्सव एकत्र साजरे करतात.

करीनाचं ओटीटी पदार्पण

बॉलीवूडमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी करीना आता ओटीटीवर पदार्पण करत आहे. तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट आज (२१ सप्टेंबर रोजी) तिच्या वाढदिवसानिमित्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये तिच्याबरोबर जयदीप अहलावत व विजय वर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday kareena kapoor khan films affair with shahid kapoor marriage with saif ali khan bebo son taimur name controversy hrc
First published on: 21-09-2023 at 10:32 IST